चोरट्यांच्या हल्ल्यात २ महिला जागीच ठार
By admin | Published: December 14, 2014 12:37 AM2014-12-14T00:37:55+5:302014-12-14T00:41:08+5:30
बेळंकीत वाटमारी : अन्य तीन महिलांनाही लुटले; लाखाचा ऐवज लंपास
मिरज : यल्लम्मा देवीची यात्रा आटोपून परतणाऱ्या महिलांवर दोन चोरट्यांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन महिला जागीच ठार झाल्या. या दोन महिलांसह त्यांच्यासोबत असणाऱ्या अन्य तीन महिलांच्या अंगावरील दागिने घेऊन चोरट्यांनी पलायन केले. सुमारे एक लाखाचा हा ऐवज असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील बेळंकी येथील गायकवाड वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज, शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लूटमारीचा हा प्रकार घडला.
सुनीता महादेव गायकवाड (वय ३५, रा. बेळंकी, ता. मिरज), मंगल सुधाकर घेवारे (४५, रा. कृष्णा घाट, मिरज) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने मिरज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बेळंकीत शुक्रवारपासून यल्लम्मा देवीची यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त भाविकांची व महिलांची मोठी गर्दी आहे. बेळंकीतील गायकवाड वस्तीवरील महिला शनिवारी रात्री देवीच्या दर्शनाला यात्रेस गेल्या होत्या. तेथून सुनीता गायकवाड, मंगल घेवारे, दीपाली गायकवाड, शकुंतला गायकवाड, कालिंदी गायकवाड या पाच जणी घरी गायकवाड वस्तीवर परतत होत्या.
बेळंकी-आरळीहट्टी रस्त्यावरून नामदेव कांबळे यांच्या शेताजवळून जात असताना वाटेत अंधारात दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी अडविले. चोरट्यांनी हातातील धारदार चाकूचा धाक दाखवून या सर्व महिलांना अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले. यावेळी दीपाली, शकुंतला, कालिंदी गायकवाड या तिघींनी घाबरून गळ््यातील व कानांतील दागिने काढून चोरट्यांना दिले. मात्र, सुनीता गायकवाड व मंगल घेवारी या दोघींनी दागिने देण्यास नकार दिला. यावेळी चोरट्यांनी या दोघींच्या पोटात, पाठीवर व छातीवर चाकूने सपासप वार केले. त्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन या दोघी रक्ताच्या थारोळ््यात कोसळल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चोरट्यांनी या दोघींच्या अंगावरील दागिने हिसकावून घेऊन अंधारात पलायन केले. या दोघींवर हल्ला होत असताना इतर तिघींनी आरडाओरडा केला. मात्र, निर्जन ठिकाणी ही घटना घडली असल्याने त्यांना लवकर मदत मिळू शकली नाही. या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक एस. के. सोनावणे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसरातील सगळ््या रस्त्यांची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु हल्लेखोर सापडले नाहीत. हल्लेखोरांनी या पाचही महिलांचे चार तोळे दागिने लुटले. या दागिन्यांची एक लाख रुपये किंमत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस हल्लेखोरांचा शोध करीत होते.
चोरटे कर्नाटकातून आल्याचा अंदाज
बेळंकी येथे यल्लम्मादेवीची यात्रा आटोपून परतणाऱ्या महिलांना लुटल्याचे आणि त्यातील दोन महिलांना चोरट्यांनी ठार केल्याचे समजताच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने तातडीने सर्वत्र नाकाबंदी केली असून, चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. हे चोरटे नजीकच्या कर्नाटकातून आले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
नकली दागिनेही लुटले
- यात्रेहून परतणाऱ्या महिला या गरीब कुटुंबातील होत्या. त्यातील एका महिलेच्या अंगावर नकली दागिने होते. तेही चोरट्यांनी लुटून नेले.
- चोरटे दोघींवर धारदार शस्त्राने वार करीत असताना अन्य तिघी आरडाओरडा करीत होत्या. मात्र, परिसर निर्जन असल्याने त्यांचा आवाज हवेतच विरला. ग्रामीण भागातील पहिलाच प्रकार
वाटमारी करणाऱ्या चोरट्यांकडून दोन महिलांना ठार केले जाण्याची ही घटना मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच घडली आहे. (प्रतिनिधी)