कोल्हापूर परिक्षेत्रात दोन वर्षांत ५९५ गुंडांना मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 06:13 PM2020-09-10T18:13:25+5:302020-09-10T18:16:29+5:30
गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस दलाने मोठ्या शर्थीने प्रयत्न केले. खून, दरोडे, हाणामारी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या.
तानाजी पोवार
कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस दलाने मोठ्या शर्थीने प्रयत्न केले. खून, दरोडे, हाणामारी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या.
अवघ्या दोन वर्षांतच ८२ टोळ्यांतील ५९५ गुंडांवर मोक्कांतर्गत कारवाई करत त्यांना गजाआड डांबले. त्यामुळे परिक्षेत्रातील गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा बसला, पण काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गुन्हेगार डोके वर काढू लागले आहेत, त्यांना पुन्हा ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यामध्ये पाचही पोलीस अधीक्षकांनी आपली कामगिरी चोख बजावत गुन्हेगारी विश्वावर वचक ठेवला. तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांचेही मोठे योगदान लाभले.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १६ टोळ्यांतील १४५ जणांवर तर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीणमधील ३५ टोळ्यांतील २४० जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. ही दोन वर्षे परिक्षेत्रातील गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरली. गेल्या चार-पाच महिन्यांत कोरोना संकटामुळे मात्र नव्या टोळ्यांवर कारवाई करण्यास पोलीस खात्याला वेळच मिळाला नाही.
कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सांगलीचे अधीक्षक डॉ. सोहेल शर्मा, पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, साताराचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुन्हेगारांवर चांगलाचा जरब ठेवला. त्यांच्या बदल्यांच्या तोंडावर गेले वर्षभर शांत राहिलेले गुन्हेगार आता पुन्हा आपले बस्तान बसविण्याच्या प्रयत्नांत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ हे वर्ष गुंडांसाठी ठरले कर्दनकाळ
कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ मध्ये १३ टोळ्यातील १२७ गुंडांच्या मुसक्या आवळल्या. इचलकरंजीतील तेलनाडे बंधूवर दुसऱ्यांदा मोक्कांतर्गत कारवाई केली, पण ते बंधू अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत. अनेक पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहीत असल्याची चर्चा आहे, पण खाल्या मिठाला जागल्याप्रमाणे काहीजण गुपचूप आपली भूमिका बजावत असल्याचेही समजते.
शिवाय २०२० मध्ये जानेवारी महिन्यात राजस्थानच्या बिष्णोई गुंडांच्या टोळीचा थरारक पाठलाग करुन त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाक्यानजीक पकडले. त्यावेळी पोलीस व गुंडांच्यात गोळीबारही झाला. त्या टोळीतील तिघांवर मोकांतर्गत करवाई केली.
जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० कोल्हापूर परीक्षेत्रातील गुन्हेगारीचा मोका कारवाईचा आलेख:
जिल्हा : टोळी संख्या - आरोपींची संख्या
१) कोल्हापूर : १६ - १४५
२) सांगली : १० - ७३
३) सातारा : १४ - ८८
४) सोलापूर ग्रामीण : ७ - ४९
५ ) पुणे ग्रामीण : ३५ - २४०
एकूण : ८२ - ५९५
कोल्हापूर जिल्हयात गेल्या पाच वर्षांतील मोक्का कारवाई
वर्षे : टोळी - आरोपी संख्या
- २०१५ : ० १ - ०४
- २०१६ : ० ३ - ३०
- २०१७ : ० ३ - १४
- २०१८ : १८ - ११५
- २०१९ : १३ - १२७
- २०२० : ० ३ - १८ (ऑगष्ट अखेर)