यंत्रमाग कामगारांना पाच वर्षांत दुप्पट मजुरीवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:35 AM2018-01-31T00:35:25+5:302018-01-31T00:36:03+5:30
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
अतुल आंबी ।
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. २०१३ साली असलेली ५२ पिकास ५८.५ पैसे मजुरी आज एक रुपये ५ पैसे झाली आहे. या मजुरीवाढीमुळे बोनसची रक्कमही वाढली आहे. सर्व कामगार संघटनांनी एकत्रित उभारलेल्या लढ्याचे हे फलित म्हणावे लागेल.
सन २०१३ पूर्वी तीन वर्षांतून एकदा यंत्रमागधारक संघटना व कामगार संघटना यांचे प्रतिनिधी व प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लवाद समिती नेमून मजुरीवाढ ठरवली जात होती. या परंपरेनुसार काही वर्षे मजुरीवाढ घोषित केली जात होती. त्यानुसार २०१३ साली ५२ पिकाला ५८.५ पैसे मजुरी होती. त्यावेळी सर्व यंत्रमाग कामगार संघटनांनी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन सुरू केले. मजुरीवाढीचा तिढा सुटत नसल्याने २१ जानेवारी २०१३ ला सुरू झालेले आंदोलन लांबत जाऊन तब्बल ३९ दिवसांनी २८ फेब्रुवारी २०१३ ला कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे तोडगा काढून संपविण्यात आले.
यावेळी मागील काही वर्षांत समाधानकारक मजुरीवाढ झाली नाही. सद्य:परिस्थितीत वाढलेली महागाई, कर्जबाजारी होत चाललेला कामगार अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सन २०१३ सालच्या करारामध्ये २८.५ पैशांची मोठी मजुरीवाढ घोषित करण्यात आली. त्यामुळे ५८.५ पैशांवरून कामगारांना ८७ पैसे मजुरी झाली. या मजुरीवाढीबरोबरच प्रत्येक तीन वर्षांनी आंदोलने करावी लागू नयेत, यासाठी सर्वमान्य तोडगा म्हणून शासनाकडून घोषित केल्या जाणाºया महागााई भत्त्याला या मजुरीवाढीची सांगड घालण्यात आली.
त्यामध्ये वर्षातून दोनदा घोषित होणाºया महागाई भत्त्याची रक्कम एकत्रित करून त्याचे पीस रेटवर रूपांतर करून प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबरपूर्वी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून याची घोषणा करावी, असा करार करण्यात आला.
२०१३ साली झालेल्या या करारानुसार दरवर्षी मजुरीवाढ घोषित केली जाते. त्यामध्ये २०१४ साली ४ पैसे, २०१५ साली ७ पैसे, २०१६ साली ७ पैसे अशी मजुरीवाढ घोषित करण्यात आली आहे.त्याप्रमाणे सध्या एक रुपये ५ पैशांपर्यंत ही मजुरीवाढ पोहोचली आहे. २०१३ साली असलेली ५८.५ पैशांची मजुरी पाच वर्षांत दामदुप्पट होऊन एक रुपये ५ पैशांपर्यंत पोहोचली आहे. सन २०१३ नंतर दरवर्षी २०१६ पर्यंत घोषित झालेली १८ पैशांची मजुरीवाढ व त्याप्रमाणात वाढलेली बोनसची रक्कम पाहता पाच वर्षांत कामगाराची मजुरी दामदुप्पट झाली आहे.
‘बोनस’चा हिशेब वेगळाच
सन २०१३ पूर्वी २३ ते २७ टक्क्यांपर्यंत बोनस दिला जात होता. २०१३ सालच्या करारामध्ये १६.६६ टक्के बोनस ठरविण्यात आला. मात्र, मजुरीवाढ झाल्यामुळे कामगारांना बोनसची रक्कमही आपोआपच वाढून मिळाली. ५८.५ पैसे मजुरी असताना सरासरी २५ टक्क्यांनी चौदा हजार ६२५ रुपयांच्या जवळपास मिळणारा बोनस हा ८७ पैसे मजुरी झाल्यानंतर १६.६६ टक्क्यांनी चौदा हजार ४९४ रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर दरवर्षी होणाºया मजुरीवाढीनुसार त्यावरील टक्केवारीनुसार बोनसच्या रकमेतही वाढ होत गेली आहे.
मजुरीवाढीचा हिशेब
एक कामगार एका वर्षात आठ माग बारा तास काम केल्यास सरासरी एक लाख मीटर कापड उत्पादन करतो. त्यानुसार २०१३ सालच्या ५८.५ पैसे मजुरीनुसार त्याला वर्षाचे ५८ हजार ५०० रुपये अधिक सरासरी २५ टक्क्यांनी दिला जाणारा चौदा हजार ६२५ रुपयांचा बोनस असे ७३ हजार १२५ रुपये कामगारांना मिळत होते. २०१३ सालच्या २८.५ पैसे मजुरीवाढीमुळे ८७ पैसे मजुरी झाली. वरील हिशेबाप्रमाणे ८७ हजार रुपये अधिक १६.६६ प्रमाणे दिला जाणारा चौदा हजार ४९४ रुपयांचा बोनस असे एक लाख १ हजार ४९४ रुपये कामगाराला मिळू लागले.
३९ दिवसांच्या संपाचे अन्य परिणाम
एकूण ३९ दिवस संप झाला असला तरी चाळीसाव्या दिवशी शुक्रवार असल्याने त्यादिवशी यंत्रमाग बंदच राहिले. त्यानंतर शनिवारपासून शहरातील यंत्रमाग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. त्यामुळे घडी बसण्यासाठी पुढे पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी गेला. एकूण ५०-६० दिवसांच्या या बंदमुळे वस्त्रोद्योग मंडीवर परिणाम झाला. कापडाची मागणी घटणे, घेतलेले काम वेळेत पूर्ण करून न दिल्याने बाहेरील कापड मंडीतून व्यक्त होणारी नाराजी, यंत्रमागधारकांचे बॅँकांकडे थकलेले हप्ते असे अनेक परिणाम वस्त्रोद्योगाला सहन करावे लागले.