लिपिकास दोन वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: April 1, 2016 01:15 AM2016-04-01T01:15:49+5:302016-04-01T01:31:03+5:30
दोनशेची लाच : शाहूवाडी तहसीलचे प्रकरण
कोल्हापूर : जमिनीचा ७/१२ उतारा देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शाहूवाडी तहसील कार्यालयातील लिपिकास जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक दोन न्यायाधीश के. डी. बोचे यांनी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा गुरुवारी ठोठावली. भगवंत तुकाराम चांदेकर (वय ३७, सध्या राहणार गणेश कॉलनी, शाहूवाडी, जि. कोल्हापूर, मूळ गाव पिंपळापूर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) असे शिक्षा झालेल्या लिपिकाचे नाव आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, बहिरेवाडी (ता. शाहूवाडी) येथील सुरेश जगन्नाथ खोत यांची त्यांच्या वडिलांचे नावे असलेली गट नंबर ४०९ मध्ये ३० गुंठे जमीन होती. या जमिनीचे ७/१२ उताऱ्याचे १९७५ पासून ते २००० पर्यंतचे उतारे त्यांना पाहिजे होते. खोत यांनी शाहूवाडीच्या तहसीलदार कार्यालयात सातबारा उताऱ्याबाबत चौकशी केली. त्यावेळी लिपिक भगवंत चांदेकर याने ‘उद्या तुम्हाला पाहिजे असलेल्या सातबारा उताऱ्याबाबतचा अर्ज घेऊन या’ असे सांगितले. त्यानंतर ६ मार्च २०१४ रोजी उतारे मागणीबाबतचा अर्ज घेऊन खोत चांदेकर याच्याकडे गेले. ‘सदरचे उतारे मी तुम्हाला देतो; परंतु त्यासाठी मला ५०० रुपये द्यावे लागतील’ असे सांगून ‘त्याबाबतचा अर्ज देऊन तुम्ही माझ्याकडे या’ असे सांगितले होते.
त्यानंतर खोत यांनी कोल्हापुरातील शनिवार पेठेमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे याच दिवशी तक्रार दिली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी तक्रारीस अनुसरून त्याची पडताळणी करण्याचे आयोजन केले. पण चांदेकर हा न्यायालयीन कामासाठी कोल्हापूरला गेला होता.
त्यानंतर १० मार्च रोजी चांदेकर याने एका पांढऱ्या रंगाच्या कागदावर २०० असा आकडा लिहून लाचेची मागणी केली. खोत यांच्याकडून २०० रुपयांची लाच घेत असताना भगवंत चांदेकर याला सापळा रचून शाहूवाडी तहसीलदार कार्यालयामध्ये पकडले. याची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात झाली होती.याचा तपास पोलिस उपअधीक्षक उदय आफळे, निरीक्षक व्ही. एस. घोरपडे यांनी केला. यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने, फिर्यादी सुरेश खोत,आदींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. भगवंत चांदेकर याला कलम सात खाली एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा के. डी. बोचे यांनी ठोठावली. सहायक सरकारी वकील म्हणून ए. एम. पीरजादे यांनी काम पाहिले.दरम्यान, भगवंत चांदेकर याने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला.