बेळगावात मराठी स्टेटस ठेवल्यामुळे दोन तरुणांना पोलिसांची बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:12+5:302021-03-16T04:24:12+5:30
बेळगाव : शिवसेनेच्या बेळगाव जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर झालेला हल्ला, मराठी फलकांची मोडतोड या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमा भागातील वातावरण कन्नड - ...
बेळगाव : शिवसेनेच्या बेळगाव जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर झालेला हल्ला, मराठी फलकांची मोडतोड या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमा भागातील वातावरण कन्नड - मराठी मुद्द्यावरून पुन्हा एकदा तापले असून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून बेळगावमध्ये सुरू असलेल्या घटना, कन्नड संघटनांचा धुडगूस आणि यानंतर सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या दोन तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या तरुणांना पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा हा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या तरुणांनी ‘मराठी भाषिक वाघ आहे’, असे स्टेटस ठेवले होते.
शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर शुक्रवारी कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला करून गाडीच्या मराठी क्रमांक असलेल्या बोर्डची काळे फासून मोडतोड केली होती. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो काही जणांनी फेसबुकवर पोस्ट करून ‘मराठी भाषिक वाघ आहे’ असे मोबाइलवर स्टेटस ठेवले होते. यानंतर कर्नाटक पोलिसांनी तरुणांची धरपकड सुरू केली आहे. याप्रकरणी दोन तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या तरुणांना पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, अन्य एका घटनेत चार तरुणांना अटक करून सोडून देण्यात आले आहे. मारहाणीच्या या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला आहे.
----------------------------
कर्नाटक पोलिसांवर मराठी जनता नाराज
सीमा भागातील मराठी भाषिकांवर नेहमीच कर्नाटक सरकार आणि पोलीस अन्याय करतात. या अन्यायाला अनेकवेळा वाचा फोडण्यात आली आहे; परंतु आजतागायत कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर गुलामगिरीची सत्ता लादत आहे. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून मराठी तरुणांवर अशी कारवाई करणाऱ्या पोलीस विभागावर मराठी जनता तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.
----------------------------
कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार शनिवारी बंद पाडणार; कोल्हापूर शिवसेनेचा इशारा
कोल्हापूर : बेळगाव महानगरपालिकेसमोरील लाल पिवळा ध्वज त्वरित हटवावा तसेच मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवावेत अन्यथा शनिवारी (दि. २०) एक दिवसासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कन्नड व्यावसायिकांचे व्यवसाय बंद केले जातील, असा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
सीमा भाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी सूचना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यापासून भाजप पुरस्कृत कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आणि कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अत्याचार करत आहेत. त्यामुळे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे देवणे व पवार यांनी सांगितले.
----------------------------
गृहमंत्री अमित शहांना पत्र
सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा म्हणून गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत पत्र देण्यात आले आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामार्फत महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या मुख्य सचिवांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
----------------------------
फोटो: १५ बेळगाव ०१
बेळगावमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या दोन तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या तरुणांना पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या तरुणांनी ‘ मराठी भाषिक वाघ आहे,’ असे स्टेटस ठेवले होते.