चारचाकी वाहनांवरील ताबा सुटल्याने चारचाकी ओढ्यात कोसळून दोन युवकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 07:24 PM2023-07-28T19:24:04+5:302023-07-28T19:24:49+5:30
गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी ओढ्यात कोसळली.
शिवाजी सावंत, गारगोटी: गारगोटी पाटगाव महामार्गावर भरधाव वेगाने चाललेल्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी ओढ्यात कोसळून दोन महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू झाला.आदिल कासम शेख (वय १९) आणि झहीर जावेद शेख (वय १९)(दोघेही रा. अनफ खुर्द, ता.भुदरगड , जि.कोल्हापूर)अशी मृत तरुणांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,आदिल शेख आणि झहीर शेख हे दोघे महाविद्यालयीन युवक सकाळी बाराच्या सुमारास अणफ खुर्द येथून गारगोटीकडे आपल्या आय २० ह्या चारचाकीतून(क्र. एम एच १२केजे ६५५०)चालले होते.आदिल शेख हा गाडी चालवीत होता. दरम्यान ते दासेवाडी येथील आप्पा वरंडेकर यांच्या शेता जवळील ओढ्या नजिक आल्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी ओढ्यात कोसळली.
हा ओढा या गावालगत असल्याने गाडी ओढ्यात कोसळताना जोरात आवाज झाला.हा आवाज ऐकून आपा वरंडेकर, सात्तापा चिले, राजु पोवार,निसार नाईक, अलिम नाईक, आणफचे माजी सरपंच रफीक शेख,जयसिंग वरंडेकर ,उमाकांत चांदम हे तेथे पोहचले.पण ओढ्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह प्रचंड वेगवान असल्याने पाण्यात जावून मदतकार्य करून त्यांना बाहेर काढणे कठीण होत होते.पण त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या दोन जखमी युवकांना बाहेर काढले.मदतीसाठी सरसावलेल्या या बहाद्दर समजसेवकांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
त्यांना उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले असता झहीर याचा मृत्यू झाला.तर आदिल याला कोल्हापूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. बेदरकार वाहन चलविल्याने या दोन युवकांचा हकनाक बळी गेला आहे.यापूर्वी या गावाना कधीही रस्ते सुस्थितीत नव्हते.पण सद्या दोन पदरी हायब्रीड अन्युईटी तंत्रज्ञानात रस्ते केल्याने गाडी चालवताना वेगाचे भान राहत नाही.पालक ही तरूणांच्या हातात गाडी देताना समज देत नसल्याने बेभान झालेली तरुणाई अपघातास आमंत्रण देत आहे.