गवारेड्याने दुचाकीला दिली धडक, बुरडे येथील दोन युवक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 05:41 PM2022-04-09T17:41:12+5:302022-04-09T17:46:36+5:30
आजरा : गवारेड्याने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत बुरुडे तालुका आजरा येथील दोन युवक गंभीर जखमी झाले. ऋषिकेश शामराव कांबळे (वय-२४) ...
आजरा : गवारेड्याने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत बुरुडे तालुका आजरा येथील दोन युवक गंभीर जखमी झाले. ऋषिकेश शामराव कांबळे (वय-२४) व दिनकर लक्ष्मण कांबळे ( ३४) अशी जखमींची नावे आहेत. उचंगी धरणावर रोजंदारीने कामासाठी जात असताना सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमी दोघांनाही उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऋषिकेश व दिनकर हे दोघे उचंगी धरणावर रोजंदारी कामगार म्हणून कामावर आहेत. ते सकाळी सहाच्या पाळीला धरण स्थळाकडे निघाले होते. उचंगी फाट्याजवळ आल्यानंतर अचानक रस्त्यावर आलेल्या गवारेड्याने यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. धडकेत दोघांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर गाडीचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर ऋषिकेशने धरण स्थळावर फोन करुन गवारेड्याने धडक दिल्याचे सांगितले. तातडीने दोघांना आजरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दाखल केले आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल स्मिता डाके, वनपाल एस. के. नीळकंठ, वनरक्षक एस. व्ही.चाळके यांनी भेट देऊन पंचनामा केला. दोघांच्याही औषधोपचाराचा खर्च देणार असल्याचे यावेळी वनपाल एस. के. नीळकंठ यांनी सांगितले.
लाळखुरकतमुळे हुडे येथे गव्याचा मृत्यू
दरम्यान उचंगीशेजारी असणाऱ्या हुडे येथे रामचंद्र देसाई यांच्या रांगी नावाच्या शेतात लाळ खुरकत आजारामुळे अशक्त झालेल्या गवारेड्या मृत आढळून आला. त्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद पाटील यांनी करून त्याला त्याच ठिकाणी दहन करण्यात आले आहे अशीही माहिती वनपाल एस.के. निळकंठ यांनी दिली.
(छाया - सदाशिव मोरे)