Kolhapur: अंबप खूनप्रकरणी तीन तरुणांच्या मुसक्या आवळल्या, एका अल्पवयीनाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:58 PM2024-12-04T12:58:03+5:302024-12-04T12:58:39+5:30
२०२३ मध्ये झालेल्या भांडणातूनच खून केल्याचे स्पष्ट, सोशल मीडियावर खुनाची पोस्ट
पेठवडगाव : अंबप येथील खून प्रकरणात पसार झालेल्या अल्पवयीनांसह दोघा तरुणांना ताब्यात घेतले आहे. संशयितांना २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
यश किरण दाभाडे याचा साेमवारी खून झाला होता. यातील तीन संशयित हर्षद दीपक दाभाडे (वय १९, रा. माळवाडी, अंबप), शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला (वय १९, रा. आनंदनगर, कोडोली) यांच्यासह एका अल्पवयीनास पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत फिर्याद तुषार मनोहर दाभाडे यांनी दिली.
हर्षद दाभाडे याचे व मृत यश दाभाडे यांच्यात किरकोळ कारणावरून सप्टेंबर २०२३ ला भांडण झाले होते. यावेळी यश दाभाडे याने हर्षद दाभाडे याच्यावर चाकूने वार केला होता. या कारणावरून यश दाभाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे वय कमी असल्यामुळे त्यावेळी बालसुधारगृहात ठेवले होते. तो काही महिन्यांपूर्वी अंबपला परतला होता.
या भांडणाचा राग हर्षद याच्या मनात होता. तो यश याचा बदला घेण्यासाठी संधीची वाट बघत होता.
दरम्यान यश वडगाव-अंबप रस्त्यावर गावाजवळ पाण्याच्या टाकी जवळ बसल्याचे त्यांना समजले. या ठिकाणी सायंकाळच्या वेळी अंधार असतो. याचा फायदा घेत हर्षद त्याचे दोन साथीदारांनी अचानक यश दाभाडे याच्यावर हल्ला केला. यावेळी जवळच्या कोयत्याने सपासप वार करून पळून गेले. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास व संशयित ताब्यात घेण्यासाठी दोन पथक नेमले.
तपास पथकातील पोलिस अंमलदार हिंदुराव केसरे यांना संशयितांची माहिती मिळाली. हर्षद दाभाडे व त्याचे साथीदार वारणानगर येथील विजय चौकात येणार असल्याचे समजले. त्यांना पकडण्यासाठी त्यांनी सापळा लावला व त्यात ते अडकले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक करीत आहेत.
सोशल मीडियावर खुनाची पोस्ट
मारेकऱ्यांनी यशला मारल्यानंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवर तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से, ३०२ अशी पोस्ट केली होती. तिघांनी एकत्रित फोटो ठेवला होता. यावरून तरुणांत खुन्नस काय असते, याची प्रचिती आली.