पुर्ववैमनस्यातून केलेल्या हल्ल्यात दोन तरुण ठार, बेळगावजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:37 PM2022-12-27T12:37:29+5:302022-12-27T12:37:58+5:30
कर्नाटक पोलीस मुख्यमंत्र्यांच्या आगमन बंदोबस्तात व्यस्त असताना दुहेरी खुनाची घटना घडल्याने उडाली खळबळ
बेळगाव : बेळगाव जवळील शिंदोळी गावात अज्ञात तिघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. बसवराज बेळगावकर (वय २४,) गिरीश नगुनावर (२४, दोघेही रा. शिंदोळी) अशी मृतांची नावे आहेत. काल, रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पुर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रविवारी रात्री अकराच्या सुमारास मारीहाळ पोलीस मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या आगमन बंदोबस्तात विमानतळावर व्यस्त असताना सांबऱ्या जवळील शिंदोळी येथे दुहेरी खुनाची घटना घडली. रात्री अकराच्या सुमारास मरिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास चालू केला. गेल्या महिन्यात सांबराजवळील सुळेभावी येथेही डबल मर्डरची घटना ताजी असताना शिंदोळी येथेही दुहेरी हत्याकांड घडले आहे. त्यामुळे बेळगावचा पूर्व भागात खळबळ उडाली असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
वाहन व्यवसाय व वैयक्तिक वैमनस्य हे खुनाचे कारण असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिंदोळी गावात क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. रविवारी स्पर्धेनंतर लोक घरी परतत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.