कोल्हापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे तरुण ठार; बालिंगा रस्त्यावर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 19:47 IST2022-09-03T19:47:21+5:302022-09-03T19:47:41+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर बालिंगा गावाजवळ शुक्रवारी रात्री साडेसहा वाजता एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे तरुण ...

कोल्हापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे तरुण ठार; बालिंगा रस्त्यावर झाला अपघात
कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर बालिंगा गावाजवळ शुक्रवारी रात्री साडेसहा वाजता एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. ऐन गणेशोत्सवात हा अपघात झाल्याने आणि दोन उमदे तरुण ठार झाल्याने करवीर तालुक्यातील चिंचवडे तर्फ कळे गावावर शोककळा पसरली आहे.
विकास संभाजी तोरस्कर (वय १९) व सलीम राजाराम कांबळे (वय २०), अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. विकास आणि सलीम शुक्रवारी गावातील अन्य दोन मित्रांसह कोल्हापूर शहरात गेले होते. रात्री गावाकडे जात असताना साडेदहा वाजेच्या सुमारास खांडसरीपासून पुढे बालिंगा गावाच्या दिशेने जात होते. एस्सार पेट्रोल पंप व अत्तार अँड सन्स या दुकानासमोर आले असता एका अज्ञात अवजड वाहनाने विकास व सलीम यांना जोराची धडक दिली. दुचाकीचा वेग जोरात होता असे सांगण्यात आले. धडक बसताच दोघेही दूरवर फेकले गेले. जोराचा मार लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाता-पायाला, डोक्याला दुखापत झाली होती. अन्य दोन मित्र काही अंतर पुढे गेले. नंतर अपघात झाल्याचे कळताच तेही मागे आले.
कोल्हापूर शहर शिवसेना समन्वयक हर्षल सुर्वे या रस्त्यावरून जात होते. अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष व महानगरपालिका अग्निशमन दलास फोन करून कल्पना दिली व जखमींना मदत मिळवून दिली. वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या दोघांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले; परंतु रुग्णालयात उपचार सुरू होईपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता, असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
अपघात झाल्याची माहिती चिंचवडे तर्फ कळे गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातील शेकडो ग्रामस्थ, तरुणांनी सीपीआर रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे रुग्णालय आवारात मोठी गर्दी झाली होती. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला. करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारीही तेथे पोहोचले.
गावातील दोन उमदे तरुण ऐन गणेशोत्सव सुरू असताना अपघातात मयत झाल्याने चिंचवडे तर्फ कळे गावावर शोककळा पसरली आहे. विकास हा खासगी कंपनीत नोकरी करीत होता, तर सलीम शिक्षण घेत होता, अशी माहिती त्यांच्या मित्राकडून मिळाली.