पंचगंगा नदीच्या पुरातून दोन युवक वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:42 AM2018-07-16T00:42:22+5:302018-07-16T00:42:27+5:30

Two youths were burnt away from Panchaganga river bed | पंचगंगा नदीच्या पुरातून दोन युवक वाहून गेले

पंचगंगा नदीच्या पुरातून दोन युवक वाहून गेले

Next


कोल्हापूर : शिवाजी पूल, पंचगंगा घाट येथे रविवारी दुपारी साडेबारा ते दोनच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेले दोन युवक पुराच्या पाण्यातून वाहून गेले. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे सात तास शोधमोहीम राबवूनही त्यांचा मृतदेह मिळून आले नाहीत. वाहून गेलेल्यांपैकी एकाचे नाव सत्यजित शिवाजी निकम (वय २०, रा. तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ) असे आहे. दुसऱ्या युवकाचे नाव, पत्ता समजू शकलेला नाही. पंचगंगा नदीला पूर आल्याने शिवाजी पुलावर पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुलावरून वाहनांची ये-जा सुरू होती. तोरस्कर चौकाकडून तीस वर्षांचा युवक धावत जुन्या शिवाजी पुलावर आला. कठड्यावर चढून त्याने कपड्यांसह नदीत उडी मारली. पुलावरील काही लोकांनी त्याला पाहिले. दीडशे मीटर अंतरापर्यंत तो पाण्यावर तरंगताना दिसून आला. तेथून पुढे दिसेनासा झाला. युवकाच्या अंगावर कपडे व काळ्या रंगाचे जॅकेट होते. यासह त्याने उडी मारल्याने नागरिकांना आत्महत्येची शंका आली. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाला कळविले. जवानांनी तत्काळ नदीघाटावर धाव घेतली. यांत्रिक बोटीच्या साहाय्याने त्याचा शोध घेतला; परंतु तो सापडला नाही.
दरम्यान, दुपारी तोरस्कर चौकातील काही तरुण अंघोळीसाठी शिवाजी पुलावर आले. सत्यजित निकम व त्याच्या चौघा मित्रांनी एकाच वेळी पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या मारल्या. चौघेही दीडशे मीटर अंतर पोहत आले. सत्यजित हा अचानक पाण्याच्या भोवºयात अडकल्याने बुडाला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तो बुडाला होता. पाणी गढूळ असल्याने बुडून त्याचा शोध घेता येत नव्हता. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून नागरिकांना बोलाविले. अग्निशामक दलाचे जवान घरी जाण्याच्या तयारीत असतानाच दुसरा प्रकार घडल्याने पुन्हा त्यांनी शोधमोहीम राबविली. शिवाजी पूल ते राजाराम बंधाºयापर्यंत दोन्ही युवकांचा शोध घेतला. जवानांनी सुमारे सात तास शोधमोहीम राबविली. मात्र, दोघेही मिळून आले नाहीत. दुपारी साडेबाराच्या सुमारास कपड्यासह वाहून गेलेला युवक कोण होता, याबाबत पोलिसांनी व अग्निशामक दलाच्या जवानांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ती मिळाली नाही. या दोन्ही घटनांमुळे नदीघाटावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
सत्यजितची ओळख
सत्यजित निकम याने नुकतीच अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्याचे वडील एस. टी. महामंडळात मेकॅनिक म्हणून नोकरी करतात. आई गृहिणी आहे. तोरस्कर चौकात त्यांचे आइस्क्रीमचे दुकान आहे. सत्यजित रिकाम्या वेळी दुकानात बसत असे. अत्यंत कष्टाळू कुटुंब म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. त्याचा मित्रांमध्ये जास्त सहवास असायचा. एकुलता मुलगा पुरात वाहून गेल्याने निकम कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सोन्या, कुठे आहेस रे बाळा...
घरातून बोलत-चालत बाहेर पडलेला मुलगा सत्यजित महापुरात वाहून गेल्याचे समजताच आई, वडील व नातेवाईक यांना धक्काच बसला. हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी पुलाकडे सर्वांनी धाव घेतली. त्याची आई तर ‘सोन्या, कुठे आहेस रे बाळा...’ म्हणून अश्रू ढाळत होती. शेजारील महिलांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. नदीघाटावर आईने फोडलेला हंबरडा मन हेलावून टाकणारा होता.

पोलिसाचा हात सोडून मारली उडी
सत्यजित निकम व त्याचे मित्र शिवाजी पुलावर आले. कपडे काढून ते कठड्यावर चढत असताना या ठिकाणी बंदोबस्ताला असणाºया पोलिसाने त्यांना रोखले. सत्यजितचा हात पकडून पाण्यात उडी मारू नकोस म्हणून त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसाचा हात सोडून त्याने थेट पुराच्या पाण्यात उडी मारली.

Web Title: Two youths were burnt away from Panchaganga river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.