नगरसेविकांनाच मिळेना बसायला कक्ष, कोल्हापूर महापालिकेतील प्रकार : तीन वर्षे कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 11:37 AM2018-08-03T11:37:04+5:302018-08-03T11:50:33+5:30
सन २०१५ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या ४१ महिला नगरसेवकांना गेल्या तीन वर्षांपासून महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात बसायला स्वतंत्र कक्ष मिळालेला नाही.
कोल्हापूर : सन २०१५ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या ४१ महिला नगरसेवकांना गेल्या तीन वर्षांपासून महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात बसायला स्वतंत्र कक्ष मिळालेला नाही.
महापालिकेच्या विश्वस्त म्हणून शहराच्या विकासाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या नगरसेविकांनाच हक्काचा कक्ष मिळत नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा होऊ लागली आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नगरसेविका काही स्वत:साठी दुकानगाळे मागत नाहीत की कायमचे कार्यालयही मागत नाहीत. ज्या-ज्या वेळी त्या महानगरपालिकेतील कामकाजाच्या निमित्ताने मुख्य कार्यालयात येतात तेव्हा काही त्यांना वेळासाठी बसायला स्वतंत्र असा कक्ष असावा, हीच त्यांची अपेक्षा आहे.
निवडून येऊ तीन वर्षे पूर्ण झाली तरी त्यांची ही अपेक्षा काही पूर्ण झालेली नाही. नगरसेविकांना महापालिकेच्या कार्यालयात एक सुसज्ज कक्ष असावा, अशी मागणी पुढे आल्यानंतर त्यांच्यासाठीच्या जागेचा शोध झाला. शेवटी तळमजल्यावरील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या दवाखान्याची जागा निवडण्यात आली.
मुख्य इमारतीतील दवाखाना दुसरीकडे स्थलांतरित करून त्या कक्षात दोन टॉयलेट, बाथरूमचे कामही पूर्ण करण्यात आले. बैठक व्यवस्थाही करण्यात आली. मात्र हा कक्ष अद्यापही नगरसेविक ांसाठी खुला केलेला नाही.
सध्या नगरसेविका विरोधी पक्षनेते विलास वास्कर तसेच महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा यांच्या कक्षात बसतात. मात्र तेथे पुरुषांचीही ये-जा असल्याने तसेच टॉयलेटची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. महानगरपालिकेची सभा ज्या दिवशी असते, त्या दिवशी तर पाच ते सहा तास नगरसेविकांना महापालिका सभागृहात थांबावे लागते, त्यावेळी मात्र बरीच कुुचंबणा होते.
नगरसेविकांची होणारी गैरसोय पाहून विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांनी महापौर शोभा बोंद्रे यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले. दीड वर्ष झाले, नगरसेविकांना कक्ष उपलब्ध करून दिला नसल्याने अडचणी निर्माण होत असून, आपल्या स्तरावर प्रशासनास आदेश देऊन हा कक्ष तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे वास्कर यांनी म्हटले आहे.