उचगावचे तलाठी कार्यालय गळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:32+5:302021-06-30T04:15:32+5:30
मोहन सातपुते उचगाव : लाखो रुपयांचा महसूल असणाऱ्या उचगावातील तलाठी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून, पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात ...
मोहन सातपुते
उचगाव : लाखो रुपयांचा महसूल असणाऱ्या उचगावातील तलाठी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून, पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात गळती लागते. इमारतीचा स्लॅब पावसाच्या पाण्यामुळे निखळून पडत आहे. या इमारतीची पडझड झाल्याने तलाठ्याला बसायलाच जागा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे ५०-६० हजार लोकसंख्येच्या उचगावात तलाठी कार्यालयासाठी नवीन इमारतीची गरज निर्माण झाली आहे. उचगावमध्ये सध्या ज्या इमारतीमध्ये तलाठी कार्यालय आहे. ती जागा सेवा सोसायटीची आहे. लोकवर्गणीतून या जागेवर तलाठी कार्यालयाची इमारत बांधण्यात आली होती. मात्र, या इमारतीची पडझड झाली आहे. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात गळती लागते. परिणामी, कार्यालयातील कागदपत्रे, प्रिंटर, लॅपटॉप, रजिस्टर खराब होत आहे. कार्यालयात पाणी साचत असल्याने येथे तलाठ्याला बसता येत नाही. त्यामुळे नागरिकांची कामे करण्यासही मर्यादा येत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह महसूल अधिकाऱ्यांनी नवीन इमारतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.
कोट : उचगावमध्ये सुसज्ज तलाठी कार्यालय होणे काळाची गरज आहे. पूर्वीची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे नवीन इमारतीसाठी जागेचा शोध सुरू आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. -मालूताई काळे, लोकनियुक्त सरपंच, उचगाव ग्रामपंचायत
फोटो : २९ तलाठी कार्यालय
उचगाव (ता. करवीर) येथील गावकामगार तलाठी कार्यालयाची पडझड झाली आहे.