मुख्यमंत्र्यांच्या सभा मार्गावर उद्धव ठाकरे यांचे बॅनर, कोल्हापुरात शिवसेनेत रंगली ईर्षा
By विश्वास पाटील | Published: February 17, 2024 01:49 PM2024-02-17T13:49:20+5:302024-02-17T13:51:06+5:30
कोल्हापूर : शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात शुक्रवारपासून होत आहे. त्याअंतर्गत शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी ...
कोल्हापूर : शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात शुक्रवारपासून होत आहे. त्याअंतर्गत शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी मैदानात होणार असून त्या मार्गावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बॅनर झळकल्याने तो शहरात चांगलाच चर्चेचा विषय झाला. त्यानिमित्याने दोन्ही शिवसेनेतील चूरस आणि खू्न्नसही पाहायला मिळत आहे.
ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी ही बॅनर लावली. त्यातून तणाव होवू नये म्हणून पोलिसांनी त्यातील दोन बॅनर काढली तरी अजूनही दोन बॅनर झळकत आहेत. ठाकरे यांच्या बॅनरला विरोधक भ्याले अशी प्रतिक्रिया इंगवले यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक राजकारणात इंगवले व शिंदे शिवसेनेचे कोल्हापूरातील प्रमुख नेते राजेश क्षीरसागर यांच्या गेल्या दोन वर्षापासून कमालीचा राजकीय संघर्ष सुरु आहे. शिवसेना एकत्रित असताना इंगवले यांना शहरप्रमुख पदावरून दूर केल्याचे निमित्त झाले व तेव्हापासून हा वाद सुरु झाला. आता क्षीरसागर यांच्या प्रत्येक कृत्याला इंगवले जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.
इंगवले हे मुळचे शिवाजी पेठेतील असल्याने त्यांच्याकडे संघटनेशिवाय स्वत:चीही तरुणांची फळी आहे. जे पटत नाही त्यावर रोखठोक व्हिडीओ करून सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची त्यांची पध्दत आहे. त्यांचे कार्यालय खरी कॉर्नर परिसरात आहे. त्याच मार्गावरून मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी कार्यकर्ते जाणार आहेत. तेच हेरून इंगवले यांनी कार्यालयाच्या भिंतीवर ठाकरे यांचे मोठे बॅनर लावले. सत्तापिपासूंना वाटत असेल मोठे नेते फोडले म्हणजे मैदान मोकळे आहे, पण लक्षात ठेवा महाराष्ट्रात गवतालाही भाले फुटतात अशी पोस्ट त्यांनी या बॅनरसोबत व्हायरल केली आहे.