मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ठाकरेंकडून विश्वासघात, मंत्री चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 11:11 AM2022-08-27T11:11:42+5:302022-08-27T11:12:32+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही चूक सुधारली

Uddhav Thackeray betrayed because of his desire to become Chief Minister, A serious allegation by Minister Chandrakant Patil | मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ठाकरेंकडून विश्वासघात, मंत्री चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ठाकरेंकडून विश्वासघात, मंत्री चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

googlenewsNext

कोपार्डे (कोल्हापूर) : २०१९ मध्ये जनतेने शिवसेना भाजपला बहुमत दिले होते. पण मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला, असा आरोप उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. पाडळी खुर्दचे काँग्रेस कार्यकर्ते डॉ. के. एन. पाटील यांनी शुक्रवारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुडित्रेच्या सरपंच जोत्स्ना पाटील होत्या. शिंगणापूर फाटा येथील वसंत हरी हॉलमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, विरोधी विचाराच्या काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाऊन माजी मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापन केल्याने सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही चूक सुधारली. आता आलेल्या सरकारने दोन महिन्यात लोकहिताचे शेकडो निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये येणार असून कोल्हापूर जिल्हा भाजप- शिवसेनामय करणार असल्याचा दावा त्यांनी केला.

भाजपात प्रवेश करण्यापूर्वी डॉ. के. एन. पाटील यांनी भाजपची विचारधारा समजून घेतली. विचार करून भाजपमध्ये प्रवेश करणाराच कार्यकर्ता कायम राहतो. आमच्या सरकारने मुंबई- गोवा महामार्गावरील टोलनाके सत्तावीस ते अकरा ऑगस्ट दरम्यान टोलमुक्त करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे ३०० कोटीचा टोल सरकार स्वतः भरणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

समरजित घाटगे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही सुरू आहे. भाजपमध्ये मात्र नवयुवकांना संधी दिली जाते. यावेळी के. एन. पाटील म्हणाले, गेली दहा वर्षे काँग्रेस पक्षासाठी व नेतृत्वासाठी काम केले पण आम्हाला दुर्लक्षित करण्यात आले. राष्ट्रीय पक्षाची विचारधारा पाहून आपण भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सरदार सावंत, सरपंच जोत्स्ना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सत्यजित कदम, सुनील कदम, डी. आर. पाटील, हंबीरराव पाटील, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील यावेळी उपस्थित होते.

महिलांची मोठी गर्दी

डॉ. पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमात वसंत हरी हॉल खचाखच भरला होता. यात महिलांची संख्या मोठी होती. शिंगणापूर फाटा येथे शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवल्याने चार तास कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावरील ट्रॅफिक जाम झाले होते.

Web Title: Uddhav Thackeray betrayed because of his desire to become Chief Minister, A serious allegation by Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.