पुढील संघर्षात शाहू छत्रपतींनी आम्हाला सोबत करावी, उद्धव ठाकरेंची अपेक्षा
By भारत चव्हाण | Published: March 21, 2024 05:44 PM2024-03-21T17:44:23+5:302024-03-21T17:46:24+5:30
ठाकरे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील सध्याची परिस्थिती जाणून घेतली.
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही जो संघर्ष करतो आहोत या संघर्षात शाहू छत्रपती महाराज यांनी पुढील काळात आम्हाला सोबत करावी, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे झालेल्या चर्चेवेळी केले. ठाकरे यांनी शाहू छत्रपतींची गळाभेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.
उद्धव ठाकरे हे तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांच्या समवेत न्यू पॅलेस येथे शाहू छत्रपती महाराज यांची गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता भेट घेऊन चर्चा केली. ही भेट चाळीस मिनिटांची होती. चर्चेदरम्यान ठाकरे यांनी शाहू छत्रपतींना पुढील संघर्षात आपली सोबत करावी. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आपली गरज भासेल तेथे प्रचाराला यावे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार सांगावेत, आम्हाला मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.
या भेटीवेळी ठाकरे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील सध्याची परिस्थिती जाणून घेतली. राज्यातील राजकीय परिस्थितीवर ठाकरे यांनी शाहू छत्रपतीं यांना माहिती दिली. चर्चेवेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, अंबरिश घाटगे, सुरेश साळोखे, सुजित मिणचेकर, मालोजीराजे छत्रपती, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी उपस्थित होते. न्यू पॅलेस परिसरात कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचाराला तर येऊच, विजयी सभेलाही येऊ - ठाकरे
चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, शाहू महाराजांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राच्या तसेच मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. मी महाराजांना वचन दिले आहे, त्यांच्या प्रचाराला तर येऊच शिवाय विजयाच्या सभेलाही नक्की येणार आहे.