शिवाजी पुतळा सुशोभीकरणाचे शुक्रवारी उद्धव ठाकरे यांचे हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 02:26 PM2019-09-02T14:26:16+5:302019-09-02T14:28:46+5:30
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्धव ठाकरे हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता विमानाने मुंबईहून कोल्हापुरात येणार आहेत. पहिल्यांदा ते अंबाबाईचे दर्शन घेणार असून, त्यानंतर विद्यापीठ हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तेथून शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी पुरात पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांचे वाटप ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील ३00 घरांची अंशत: व पूर्णपणे पडझड झाली आहे, त्यांना माझ्यावतीने १0 हजार रुपये मदतीचे वाटप करणार आहे. तेथून ते शाहूवाडी येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
फ्लॅटधारकांनाही नुकसानभरपाई मिळणार
पुराचे पाणी आलेल्या अपार्टमेंटमधील सर्वच कुटुंबांना सांगलीमध्ये नुकसानभरपाई देण्यात आली; पण येथे देणार नसल्याचे समजले, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असून, सांगलीप्रमाणे येथेही मदत देऊ व व्यापाऱ्यांनाही दोन दिवसांत ५० हजारांप्रमाणे नुकसानभरपाई देऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्वाही दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.