उद्धव ठाकरेंकडून २०१८ लाच लोकशाहीची विटंबना, मंत्री दीपक केसरकर यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:16 PM2023-02-18T13:16:36+5:302023-02-18T13:17:12+5:30
बाळासाहेबांचे नातू म्हणून सोडतोय
कोल्हापूर : लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळा काढणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी २०१८ साली शिवसेनेच्या घटनेत दुरूस्ती करून सर्व नियुक्तीचे अधिकार स्वत:कडे घेतले. ती लोकशाहीला धरून नव्हती. ही दुरूस्ती त्यांना अंगलट येणार असल्याने निवडणूक आयोगालाही पाठवली नाही. त्यामुळे ठाकरे यांनीच त्यावेळी लोकशाहीची विटंबना केली, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केला.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यावेळी उपस्थित होते. म्हणाले, निवडणूक आयोगाचा निकाल मी वाचला आहे. आयोगाने याबाबत निर्णय घेऊ नये म्हणून ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. परंतु, विविध प्रकरणांचा अभ्यास करून हा निर्णय दिला गेला. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी सध्या राज्यभर शिव्याशाप देत दौरे काढले जात आहेत. आम्ही केवळ बाळासाहेबांच्या विचारांवर चालायचे म्हणून आम्ही आमदार आणि मंत्रिपदे पणाला लावली.
२०१८ची ही लोकशाहीविरोधी पक्षाची घटनादुरूस्ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली जाईल तेव्हा हे पूर्ण उघडे पडतील. तुम्ही स्वत: लोकशाही मानत नाही आणि लोकशाहीची भाषा करता. हे तुम्हाला शोभत नाही.
बाळासाहेबांचे नातू म्हणून सोडतोय
उध्दव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून त्यांच्या उलट बोलत नाही, तर आदित्य हे बाळासाहेबांचे नातू आहेत म्हणून त्यांना सोडतोय. त्यांच्यापेक्षाही वाईट पण योग्य आम्ही बोलू शकतो. त्यामुळे आदित्य यांनी खोटे बोलत फिरायचे बंद करावे, असेही पालकमंत्री केसरकर यांनी बजावले.
इतिहासात पहिल्यांदाच
वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. ही चूक त्यांना कोणी करायला लावली, हे माहिती नाही. परंतु यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये याचा चुकीचा संदेश गेला, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.