उदगाव-अंकली पुलाचे मजबुतीकरण होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:53+5:302021-04-10T04:24:53+5:30
मजबुतीकरणाचा नव्याने प्रस्ताव जयसिंगपूर : दीडशे वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव-अंकली पुलाच्या मजबुतीकरणासाठी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ...
मजबुतीकरणाचा नव्याने प्रस्ताव
जयसिंगपूर : दीडशे वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव-अंकली पुलाच्या मजबुतीकरणासाठी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुढाकार घेतला आहे. तात्पुरत्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला असला तरी या पुलाचे संवर्धन व्हावे व पुढे हा पूल आणखी मजबूत असावा, हा हेतू ठेवून प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. दळणवळणाला चालना मिळावी, यासाठी १४४ वर्षांपूर्वी संस्थानिक व ब्रिटिश सरकारने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर हा पूल उभारला होता. त्यामुळे हा पूल इतिहासाची साक्ष देत आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत पुलाची दुरवस्था झाली आहे. पिलरमध्ये भेगा पडल्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. पुलाला कोणताही मोठा धोका नसला तरी त्याची दुरुस्ती करून घेण्याबाबतचा अहवाल देण्यात आला होता. शिवाय पुलाच्या पाण्याखालील भागाची दुरुस्ती करण्याच्या आयआयटी तज्ज्ञांच्या समितीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या पुलाच्या मजबुतीकरणाचा विषय पुढे आला होता. पुलाच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, अपुऱ्या निधीमुळे शासनाकडे नव्याने प्रस्ताव देण्यात आला होता. दरम्यान, तात्पुरत्या डागडुजीऐवजी रेल्वेपुलाप्रमाणे या पुलाचे देखील मजबुतीकरण करण्यात यावे. जॅकेट पद्धतीने हा पूल मजबूत व्हावा, यासाठी राज्यमंत्री यड्रावकर यांनी पुढाकार घेतला. याचा प्रस्तावही तयार केला जात आहे.
फोटो - ०९०४२०२१-जेएवाय-०८-लोकमतचे वृत्त