उदगाव चौक बनला अपघाताचे केंद्र

By admin | Published: September 15, 2015 01:11 AM2015-09-15T01:11:51+5:302015-09-15T01:11:51+5:30

सातत्याने अपघातसत्र : दिशादर्शक फलकांची गरज; अतिक्रमणे काढण्याची मागणी

Udgaon Chowk became the center of the accident | उदगाव चौक बनला अपघाताचे केंद्र

उदगाव चौक बनला अपघाताचे केंद्र

Next

जयसिंगपूर : अनेक आंदोलनानंतर सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्ता मंजूर झाला. तरीही रखडलेल्या व जयसिंगपुरातून जाणाऱ्या तमदलगे-उदगाव या दुपदरीकरण रस्त्यावर अपघातांच्या घटना घडतच आहेत. यामध्ये प्रामुख्याने उदगाव हे अपघाताचे केंद्र बनत आहे.
सांगलीकडे वळण घेणारा हा रस्ता अपघातास निमंत्रण देत असून, या मार्गावरील अतिक्रमणे काढण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. खबरदारीचे योग्य नियोजन झाले, तरच अपघात टळणार आहेत. सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेले उदगाव हे मोठे गाव आहे. येथून शिरोळ, नृसिंहवाडी, चिंचवाड, अर्जुनवाड, जयसिंगपूर रेल्वे स्टेशन, सांगली, जयसिंगपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. उदगावमधील बसस्थानक चौकात लहान-मोठे असे अनेक अपघात घडत आहेत. या अपघातांत गेल्या वर्षभरात १५-२० जणांचा बळी गेला आहे.
उदगाव येथे सांगली-कोल्हापूर मार्गावरील खोत पेट्रोल पंपाजवळचे बाह्यवळण, उदगाव-शिरोळ रस्ता, तसेच रेल्वेब्रीज, अंकली टोलनाका हे अपघातांचे केंद्र बनले आहेत. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम सुरू असून, उदगावमार्गे जाणारा रस्ता दुपदरी होणार आहे. मात्र, रस्ता अरुंदच राहिल्यामुळे पुन्हा अपघाताची शक्यता आहे. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. उदगाव येथील बसस्थानक चौकामध्ये रस्ता अरुंद आहे. तसेच परिसरात अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणात असून, अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. महामार्गालगतच प्राथमिक शाळा आहे. ही शाळा माळावरील शाळेत भरविण्याची गरज निर्माण झाली आहे.
येथील बसथांब्यावर प्रवासी वर्गाला जीव मुठीत घेऊन थांबावे लागते. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्यामुळे बस थांबल्यानंतर वाहतूक कोंडी होते. यामुळे बसस्थानक दुसरीकडे हलविण्याची गरज असून, ग्रामपंचायतीकडे त्यासाठी जागाही उपलब्ध आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महामार्गावरच्या बाह्य वळणावर पथदिवे, गतिरोधक, दिशादर्शक फलक लावण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Udgaon Chowk became the center of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.