उदगाव ग्रामपंचायत नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:07+5:302021-08-26T04:25:07+5:30
उदगाव : उदगाव ग्रामपंचायत दररोज वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहे. मासिक मिटिंगमध्ये झालेले विषय इतिवृत्तावर न घेता मनमानी पद्धतीने ...
उदगाव : उदगाव ग्रामपंचायत दररोज वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहे. मासिक मिटिंगमध्ये झालेले विषय इतिवृत्तावर न घेता मनमानी पद्धतीने इतिवृत्त लिहित असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना दिले. तर ग्रामपंचायतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे थेट सरपंच, ग्रामसेवकासह दोन सदस्यांच्या ही मोबाईलला जोडले असल्याने महिला सदस्यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रामविकास अधिकारी बेकायदेशीररीत्या निविदा प्रसिद्ध करतात व उघडल्या जातात. मासिक मिटिंगच्या चर्चेविना मोठ्या रकमा खर्ची टाकल्या जात आहेत. याचबरोबर सीसीटीव्हीचे थेट प्रक्षेपण कोणत्याही चर्चेशिवाय सदस्यांच्या मोबाईलमध्ये होत असल्याने महिला सदस्यांनी याला विरोध केला आहे. हे प्रक्षेपणाने महिलांच्या सुरक्षिततेचा विषय निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी व सरपंच कलीमून नदाफ यांना विचारले असता आम्हाला या प्रकरणाची माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायत कोण चालवत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवेदनावर उपसरपंच रमेश मगदूम, ॲड. हिदायत नदाफ, जगन्नाथ पुजारी, ज्योत्स्रा गदगडे, भारती मगदूम, सुनीता चौगुले, मेघराज वरेकर, पूजा जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चौकट - सदस्यांनी पोरखेळ थांबवावा
सदस्यांची निवड होऊन सहा महिने झाले आहेत. परंतु सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाकडून पोरखेळ सुरु आहे. ग्रामपंचायतीकडे लोकशाहीचे पवित्र मंदिर म्हणून पाहिले जाते. परंतु ग्रामपंचायतीमध्ये शिवीगाळ करणे, मोठ्या आवाजात दंगा घालणे, प्रत्येक कामात राजकीय आडकाठी आणणे यासारखे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आतातरी सदस्यांनी पोरखेळ थांबवावा.
फोटो - २५०८२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - उदगाव ग्रामपंचायत संदर्भात तक्रारीचे निवेदन देताना उपसरपंच रमेश मगदूम, ॲड . हिदायत नदाफ यांच्यासह सदस्य उपस्थित होते.