उदगावला स्वतंत्र बसस्थानकाची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:15+5:302020-12-07T04:18:15+5:30
शुभम गायकवाड उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) हे गाव सांगली-कोल्हापूर महामार्गालगत आहे. गावची लोकसंख्या २२ हजार असून शासकीय कर्मचारी, ...
शुभम गायकवाड
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) हे गाव सांगली-कोल्हापूर महामार्गालगत आहे. गावची लोकसंख्या २२ हजार असून शासकीय कर्मचारी, खासगी कामगार, विद्यार्थी व इतर वाहतूक असल्याने कायमस्वरूपी गजबजलेली परिस्थिती असलेले बसस्थानक आहे. नेहमीचा रहदारीचा रस्ता असल्याने कित्येकदा या मार्गावर अपघात झाले आहेत. त्यामुळे गावासाठी स्वतंत्र बसस्थानक असावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सध्याचे बसस्थानक हे अगदीच तोकडे असून बसथांब्यासाठी खास अशी जागा नाही. गेली २० वर्षे ते धूळ खात पडले होते. २०१५ मध्ये ड्रीम फौंडेशनच्या माध्यमातून त्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु बस तसेच इतर खासगी वाहने मुख्य रस्त्यावरच उभी असतात. तेथूनच प्रवाशांची चढउतार असते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखी स्थिती आहे. स्वतंत्र बसस्थानकाला मुख्य रस्त्यावरच हनुमान पाणीपुरवठ्यासमोर मोठी जागा उपलब्ध आहे. तिथे बसस्थानक झाल्यास कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज, सांगली येथून येणाऱ्या बसेससाठी थांबा मिळेल. त्यामुळे उदगावला सगळ्या बसेसचा थांबा असावा, ही मागणी आपोआपच पूर्ण होणार आहे.
चौकट -लांब पल्ल्याच्या बसेसचा नेहमीच अन्याय
उदगाव येथे एकही लांब पल्ल्याची बस थांबत नाही. तसेच सांगली, कोल्हापूरला जाणाऱ्या लाल फलक असलेल्या बसेसही थांबत नाहीत. त्या प्रश्नावर तीन ते चार वेळा रास्ता रोको, आंदोलने झाली आहेत. प्रशासनाने लेखी पत्र देऊनही गाड्या थांबत नसल्याने उदगाव थांबा नेहमीच वादात राहिला आहे.
...............
कोट - उदगावला स्वतंत्र बसस्थानक व्हावे यासाठी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना भेटून मागणी करणार आहोत. पाणीपुरवठासमोर बसस्थानक झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवाशी, वाहतूकधारकांना शिस्त लागणार आहे.
- सागर कदम, संस्थापक ड्रीम फौंडेशन
फोटो - ०६१२२०२०-जेएवाय-०२
फोटो ओळ - मुख्य रस्त्यावरच प्रवाशांची चढ-उतार असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात उदगाव-कोल्हापूर मुख्य रस्त्यालगत उपलब्ध असणारी जागा.