उदगावकरांच्या पाचवीला कचराच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:05 AM2017-09-12T00:05:33+5:302017-09-12T00:05:33+5:30
संतोष बामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गावाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिले आहेत. वांरवार नागरिकांमधून कचरा उठाव करण्याची मागणी केली जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फक्त आश्वासन मिळत असल्याने उदगावचे नागरिक कचरा व दुर्गंधीला त्रासले असून, उदगावकरांच्या पाचवीला कचराच कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ओळखून तत्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
जयसिंगपूर शहरालगत व सांगली-कोल्हापूर माहामार्गावरील सुमारे २२ हजारांवर लोकसंख्या असलेल्या उदगावचा वाढत्या उपनगरांमुळे मोठ्या प्रमाणात विस्तार वाढला आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक गल्लीची स्वच्छता तीन ते चार महिन्यांतून किंवा नागरिकांचा मोर्चा आल्यावर केली जाते. तर गेल्या वर्षभरापासून गावातील अनेक चौकांत कचºयाचे ढीग तब्बल दोन ते तीन महिने पडून राहत आहेत. त्यामुळे गावातील अनेक प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
नागरिकांतून वारंवार ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना कचºयाबाबत सांगितले जाते. मात्र, कमी कर्मचाºयांचे कारण सांगून कचºयाकडे दुर्लक्ष केल्यानेच कचरा प्रश्न वारंवार समोर येत आहे. तर शुक्रवारी दलित समाजाच्यावतीने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ग्रामविकास अधिकाºयांना महिलांनी घेराव घातल्यानंतर दलित वस्तीतील कचरा काढण्यास सुरुवात झाली. मात्र, प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी जर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढल्यानंतर स्वच्छता केली जात असेल, तर ग्रामपंचायत काय काम करीत आहे? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
चिंचवाड, जयसिंगपूर, उमळवाड, रेल्वे स्टेशन, सांगली, नदीवेस, काळम्मावाडी, फकीर रस्ता, गावठाण तलाव यांसह परिसरातील रस्त्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.