कोल्हापुरी चिवड्याला उज्जैनचा तडका

By admin | Published: October 26, 2014 11:58 PM2014-10-26T23:58:15+5:302014-10-27T00:01:06+5:30

लग्नसराईत पोह्यांना मागणी अधिक : उज्जैन, बेळगाव, नवसारी, आदी बाजारपेठांतील ५०० टन पोहा कोल्हापुरात--‘लोकमत’संगे जाणून घेऊ...

Ujjain's Kodhapuri Chivadya Tadka | कोल्हापुरी चिवड्याला उज्जैनचा तडका

कोल्हापुरी चिवड्याला उज्जैनचा तडका

Next

सचिन भोसले- कोल्हापूर -दिवाळी म्हटले की, फराळाचे पदार्थ ओघाने आलेच. त्यात चिवडा हमखास असतो. तो मग पातळ पोह्यांचा असो अथवा जाड भाजक्या पोह्यांचा असो, नाही तर तळलेल्या भाजक्या पोह्यांचा असो. त्यात खास असणाऱ्या कोल्हापुरी चिवड्याची चवच न्यारी. अशा या चिवड्याला उज्जैन येथील भडस जातीचाच भाजका पोहा लागतो. त्यामुळे कोल्हापुरी चिवड्याला जणू ‘उज्जैन (भडस)चा तडका’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. केवळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उज्जैन, बेळगाव, नवसारी, आदी बाजारपेठांतून कोल्हापूरच्या पोहा विक्रेत्यांकडे सुमारे पाचशे टन इतका विविध प्रकारचा पोहा दाखल झाला होता, अशा या पोह्याबद्दल जाणून घेऊ ‘लोकमत’संगे.
पोहे म्हटले की, राज्याच्या कानाकोपऱ्यांत सकाळच्या नाष्ट्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही; तर दिवाळी म्हटले की भाजक्या पोह्यांचा चिवडा लगेचच समोर येतो. त्यामुळे चिवड्याचे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. अशा या कुरकुरीत कोल्हापुरी चिवड्यासाठी सर्वसाधारणपणे तांदळापासून तयार केलेले भाजके पोहे लागतात. त्यातही भडस (उज्जैन) येथील भडस जातीचे जाड, पातळ, भाजके असे पोहे आहेत.
त्यातील कांदापोह्यांसाठी भडस जातीचा पोहा लागतो. हा पोहा तत्काळ पाण्यात भिजत नाही. तो काही काळ पाण्यात भिजत ठेवावा लागतो. त्याची चवही निराळीच आहे. हा सर्वसामान्यपणे हॉटेल, चहाच्या छोट्या टपऱ्या आणि केवळ कांदापोह्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
असेही पोहे खाऊ शकता
पोहे कच्चे नुसते पाण्यात किंवा दुधात भिजवूनही खाल्ले जातात. याशिवाय साखर, मीठ, शेंगदाण्याचे कूट घालून फोडणी देऊनही खाल्ले जातात. देशाच्या काही भागांत मिक्सरला बारीक करून पेस्ट करूनही तो खाल्ला जातो. महाराष्ट्रात पोहे पाण्यात भिजवून बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची, मोहरी दाणे, हळद यांची फोडणी देऊन कांदापोहे केले जातात. बेकरी पदार्थ म्हणून नाष्ट्यासाठी ब्रेड दररोज खाणारी मंडळी आहेत; त्याप्रमाणेच रोजच पोहे खाणारी मंडळीदेखील आहेत. त्यामुळे ब्रेडच्या बरोबरीने पोहेही फस्त केले जातात. याचबरोबर कोरडे पोहे घेऊन नारळाच्या पाण्यात भिजवून त्यात ओला नारळ किसून, मिरची पावडर, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हळद, मीठ, साखर यांची फोडणी देऊन केलेले ‘दडपे पोहे’ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. याशिवाय भाजक्या पोह्यांचा वापर पुणेरी, कोल्हापुरी, भोजपुरी, आदी चिवडा तयार करण्यासाठी केला जातो. त्यातही नायलॉन पोह्यांचा चिवडा पातळ पोहे चिवडा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.
‘भडस’ची रेलचेल दोन्हीकडेही
भडस या जातीचे चिवड्याचे व कांदापोहेच पोहा बाजारात आहे. चिवडा प्रकारासाठी भडस जातीचे भाजके पोहे आहेत. त्यातही तळून चिवडा करण्यासाठी वेगळा प्रकार आहे, तर कच्चा, नुसता फोडणी देऊन तयार करण्यासाठी लागणारा भडस भाजका पोहा विक्रीसाठी बाजारात आला आहे. त्याचबरोबर भडस जातीचा पातळ पोहा, जो कांदापोह्यांसाठी लागतो, त्यालाही मोठी मागणी आहे.
पचनाला हलका नाष्टा
‘पचनाला हलका पदार्थ’ म्हणून सर्वसामान्य माणूस या कांदापोह्यांकडे वळतो. हा नाष्टा केवळ पाच ते दहा रुपयांमध्ये येत असल्याने साहजिकच पोह्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. भारतासह नेपाळ, बांगलादेशमध्येही नाष्टा म्हणून हा पदार्थ खाल्ला जातो. याशिवाय मधल्या वेळेचे खाणे म्हणूनही खाल्ला जातो.
कांदापोह्यांसाठी वेगळा पोहा
कांदापोहे तयार करण्यासाठी देशभरातील हॉटेल, छोटे धाबे, घरगुती जाणकार केवळ भडस या जातीचा जवारी पोहा वापरतात. तो चवीला उत्तम असून, जादा वेळ पाण्यात भिजविला जातो. एकपट पोहा पाण्यात भिजविल्यानंतर साधारण चारपट इतका दिसतो. त्याचबरोबर हे पोहे करण्यासाठी तेलही कमी लागते. त्यामुळे या पोह्याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या पोह्यांचा दरही सर्वसाधारण पोह्यांपेक्षा किमान चार ते पाच रुपये अधिक आहे. त्याखालोखाल गुजरातमधील नवसारी येथील नवसारी जातीचा पोहाही संपूर्ण देशभर वापरला जातो. हा पोहाही चवीला उत्तम आहे.

जादा जागा व्यापणारा माल
सर्वसाधारणपणे भाजके पोह्यांचे २० किलोंचे पोते भरते, तर कांदापोह्यांचे पोते ३५ किलो इतके भरते. त्यामुळे सर्वसाधारण पोत्यांमध्ये ५० किलो ते १०० किलो इतका माल भरला जातो. त्यामुळे केवळ २० आणि ३५ किलो वजनाचाच माल भरत असल्याने ठेवण्यासाठी जादा जागा या पोहे मालाला लागते. त्यामुळे वजनाने हलका असणारा पोहा प्रत्यक्षात जादा जागा व्यापतो.
यंदा पावसाचा प्रभाव
सर्वसाधारणपणे कोल्हापूरसह कोकण, कर्नाटकातील काही भागांत उज्जैन येथील भडस येथून मोठ्या प्रमाणात चिवडा व कांदापोह्यांचा पोहा विक्रीसाठी येतो. यंदा उज्जैन परिसरात झालेल्या अतिपावसामुळे पाना अर्थात पोह्यांवर लालसरपणा आला आहे. यंदाचा पोहा केमिकलविरहित असल्याने चवही चांगली आहे. या नेहमीच्याच पोह्यांबरोबर नाचणी, मका, गहू, शाबू हे पोहेही विक्रीसाठी बाजारपेठेत आले आहेत.
- मन्सूरभाई मुल्लाणी, घाऊक पोहा व्यापारी
सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर तुळशीचे लग्न झाल्यानंतर विवाहाचे मुहूर्तही मोठ्या प्रमाणात अधिक असतात. त्यामुळे लग्नात चिवडा-लाडूची पॅकेट वऱ्हाडी मंडळींना दिली जातात. त्याचबरोबर लग्नासाठी आलेल्या पाहुणे मंडळींना सकाळचा नाष्टा म्हणून कांदापोहे दिले जातात. त्यामुळे या लग्नसराईच्या काळात कांदापोहे बाजारपेठेत अधिक मागविले जातात. सर्वसाधारणपणे कोल्हापूरच्या बाजारपेठेत महिन्याकाठी दोन्ही प्रकारचे १० टन पोहे विक्रीसाठी येतात. तितकेच खपतातही.

यंदा पावसाचा प्रभाव
सर्वसाधारणपणे कोल्हापूरसह कोकण, कर्नाटकातील काही भागांत उज्जैन येथील भडस येथून मोठ्या प्रमाणात चिवडा व कांदापोह्यांचा पोहा विक्रीसाठी येतो. यंदा उज्जैन परिसरात झालेल्या अतिपावसामुळे पाना अर्थात पोह्यांवर लालसरपणा आला आहे. यंदाचा पोहा केमिकलविरहित असल्याने चवही चांगली आहे. या नेहमीच्याच पोह्यांबरोबर नाचणी, मका, गहू, शाबू हे पोहेही विक्रीसाठी बाजारपेठेत आले आहेत.
- मन्सूरभाई मुल्लाणी, घाऊक पोहा व्यापारी

Web Title: Ujjain's Kodhapuri Chivadya Tadka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.