शासनाला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:41+5:302021-04-07T04:25:41+5:30
कोल्हापूर : ‘ ब्रेक द चेन’अंतर्गत सरसकट दुकाने बंदच्या नियमाबद्दल राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाने या विषयावर उद्या, गुरुवारपर्यंत ...
कोल्हापूर : ‘ ब्रेक द चेन’अंतर्गत सरसकट दुकाने बंदच्या नियमाबद्दल राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाने या विषयावर उद्या, गुरुवारपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा शुक्रवार (दि. ९) पासून व्यवसाय सुरू करू, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने मंगळवारी दिला.
संस्थेच्या वतीने आयोजित राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, आशिष पेडणेकर, राजेंद्र बाठिया, मोहन गुरनानी यांच्यासह विविध जिल्ह्यांतील व्यापारी संघांच्या प्रमुखांनी सहभाग घेतला.
यावेळी व्यापाऱ्यांनी विकएंड लॉकडाऊनच्या नावाखाली पूर्ण लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाचा निषेध करीत कोणत्याही परिस्थितीत यात व्यापारी सहभागी होणार नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या. राज्य शासनाशी चर्चा करून या आदेशात तत्काळ दुरुस्तीसाठी चेंबरने प्रयत्न करावेत. उद्या, गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्यास, शुक्रवारी सर्व व्यापारी कोरोना प्रतिबंधाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपापले व्यवसाय सुरू करतील, असा इशारा देण्यात आला.
--