चित्रातून व्यक्त झालेल्या उमा कुलकर्णी
By Admin | Published: March 1, 2017 11:59 PM2017-03-01T23:59:02+5:302017-03-01T23:59:02+5:30
शब्दांसोबत त्यांनी चित्रकलेचीही आवड जोपासली आहे.
अनुवादक उमा कुलकर्णी यांना लेखिका म्हणून ओळखले जाते, मात्र शब्दांसोबत त्यांनी चित्रकलेचीही आवड जोपासली आहे. प्रसिद्ध लेखिका, अनुवादिका उमा कुलकर्णी यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘इंप्रेशन्स’ या नावे गेल्या चार दिवसांत कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनच्या कलादालनात भरले होते. त्यांच्या या कोल्हापुरातील पहिल्याच चित्रप्रदर्शनाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
उमा कुलकर्णी यांच्या चित्रप्रदर्शनाचा वाचकांसह कलाप्रेमी रसिकांनी आस्वाद घेतला. उमातार्इंनी १९८१ साली पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून चित्रकला विषयात एम. ए. पदवी घेतली. त्याच सुमारास त्यांच्या जीवनात अनुवादपर्वाला सुरुवात झाली. त्यांचं पहिलं पुस्तक आलं आणि चित्रं काढणं मागे पडलं. त्याआधी विद्यार्थिनी म्हणून त्यांची चित्रे प्रदर्शनात सादर झाली होती. लेखनात अधिकाधिक गुंतत असताना उमातार्इंची फोटोग्राफी मात्र सुरू होती. पंचवीस वर्षे कन्नड भाषेतील महत्त्वाची पुस्तके त्या मराठी भाषेत आणत राहिल्या. कन्नड आणि मराठी संस्कृतींतील उमाताई एक दुवा बनून गेल्या. ‘माझ्यासाठी अनुवाद ही प्रतिक्षिप्त क्रिया होऊ लागली. त्यातील आव्हान संपून गेलं आणि मी साहजिकच चित्रांकडे पुन्हा वळले. कागद व रंगांत खेळायला लागले. शब्दांमागे जे आहे ते व्यक्त करण्यासाठी मी चित्रं हे माध्यम निवडलं. रंगरेषांपलीकडचा शोध सुरू आहे. ज्ञात आकाराच्या बाहेर पडून त्यापलीकडे रंगरेषांशी भिडणं सुरू आहे.’ उमाताई आपल्या चित्रांबद्दल आस्थेने बोलत असतात, ‘सुचेता तरडे, शरद तरडे या चित्रकार मित्रांनी, तर प्रभाकर कोलते, अनिल अवचट या नामवंतांनी सूचना केल्या; त्यामुळे माझा हुरूप वाढत गेला.’ चित्र काढण्यापूर्वी तुम्ही काही विशेष करता का? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘विशेष काही करीत नाही; पण कॅनव्हाससमोर बसते, रिकामा कॅनव्हास साद घालू लागतो. त्या दिवशीच्या मूडप्रमाणे मी रंगांची निवड करते. हा एक हुरहुर लावणारा प्रवास असतो. जे चित्र फसतं ते टाकून देते.’ आपल्या चित्रांचा आस्वाद रसिकांनी स्वच्छ मनाने घ्यावा, असं उमाताई सांगतात. तुमचं चित्र पूर्ण झालं असं तुम्हाला कधी वाटतं? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘चित्र पूर्ण झालं असं वाटल्यावर ते एका विशिष्ट जागी ठेवते.
तिथूनच ते चित्र माझ्याशी बोलतं. चित्रकाराला ते ओळखता यावं लागतं. चित्रांचं म्हणणं ऐकता यावं लागतं. चित्र पूर्ण झालं की मीही त्यापासून विलग होते, ते माझं राहत नाही.’ शब्दाचे सशक्त माध्यम अभिव्यक्तीसाठी निवडल्यानंतर रंगरेषांच्या साथीने उमा कुलकर्णी यांच्या नव्याने सुरू झालेल्या या चित्रप्रवासास शुभेच्छा!
- डॉ. प्रिया दंडगे,
कोल्हापूर