उमा पानसरे यांचा जबाब तीन टप्प्यांत पूर्ण
By admin | Published: May 15, 2015 11:46 PM2015-05-15T23:46:26+5:302015-05-16T00:05:01+5:30
मारेकरी मात्र बेपत्ताच : डावे पुरोगामी पक्ष व विविध संघटनांची बुधवारी निषेध फेरी
कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांचा जबाब पूर्ण झाला. हा जबाब गोपनीय ठेवण्यात आला आहे. तपास अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पानसरे यांच्या जबाबाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना दिली. दरम्यान, आज, शनिवारी (दि. १६) पानसरे यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण होत आहेत अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले नसल्याने कार्यकर्त्यांसह समाजातही अस्वस्थता आहे.
कोल्हापुरात १६ फेबु्रवारी २०१५ ला सागरमाळ परिसरात गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये जखमी झालेले पानसरे यांचा मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २० फेब्रुवारीला मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) यांनी तपास केला आहे.. पानसरे यांच्या हत्येचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल करत होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी उमा पानसरे यांचा जबाब घेतला. तीन टप्प्यांत त्यांना आठवेल अशा पद्धतीने जबाब घेण्यात आला.
उमाताई यांची प्रकृती आता सुधारली असली तरी त्यांच्या शरीराच्या एका बाजूला मार बसला आहे. त्यात फारशी सुधारणा नाही. त्यांची स्मृती सुधारली असली तरी हल्ला झाला त्यादिवशी नेमके काय घडले याबद्दल मात्र त्यांना आजही काहीच आठवत नाही. अगदीच त्रोटक माहिती त्या देत आहेत. दरम्यान, गोयल यांची वर्धा येथे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे परंतु अजूनही ही जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हल्ल्याच्या तपासातही ते सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळे गोयल यांची बदली झाल्यामुळे तपास विस्कळीत होण्याची शक्यता नसल्याचे खात्याचे म्हणणे आहे.
कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरात सकाळी-सकाळी कोणीतरी मारेकरी मोटारसायकलवरून येतात आणि पानसरे यांच्यासारख्या व्यक्तीला गोळ््या घालून पसार होतात व तब्बल तीन महिने झाले तरी पोलिसांना त्याबद्दल काहीच माहिती हाताला लागत नाही याबद्दल समाजमनात कमालीची चीड आहे. ती चीड व्यक्त करण्यासाठी येत्या बुधवारी (दि.२० मे) पानसरे कुटुंबीय व डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्यावतीने पहाटे साडेसहा वाजता निषेध फेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी पानसरे यांच्या आयडियल सोसायटीतील बंगल्यापासून सुरू होईल.तिथून ती जिथे हल्ला झाला तिथे जाईल. पानसरे यांचा रोजचा मार्निंग वॉकचा मार्ग होता. त्या मार्गावरून ही फेरी विद्यापीठातील परीक्षा विभागापर्यंत जाईल तिथे पानसरे नेहमी कट्ट्यावर बसत असत. तिथून परत येऊन पानसरे यांच्या बंगल्यासमोर समारोप होईल.
आज, शनिवारी पानसरे यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण
तीन टप्प्यांत त्यांना आठवेल अशा पद्धतीने जबाब घेण्यात आला
उमाताई यांची स्मृती सुधारली तरी हल्ला झाला त्यादिवशीचे आठवत नाही.