उमा पानसरेंच्या निवासस्थानी सुरक्षा वाढविली
By Admin | Published: March 27, 2015 12:18 AM2015-03-27T00:18:28+5:302015-03-27T00:21:47+5:30
पोलीस तळ ठोकून : गुन्हेगारांचा कर्नाटकात शोध जारी; तपासाला पुन्हा गती
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मिरजेतील ‘त्या’ सराईत गुन्हेगाराचा कर्नाटकात कसून शोध सुरू असून, त्याचा शोध घेऊनच माघारी परतण्याचे आदेश वरिष्ठांनी पथकांना दिले असल्याने ही पथके कर्नाटकातच तळ ठोकून असल्याची पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली.
मिरजेतील ‘त्या’ दाम्पत्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांचा थंडावलेला तपास पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. संबंधित गुन्हेगार हाती लागणे पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यानंतरच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे. हत्येच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उमा पानसरे यांच्या निवासस्थानी चोवीस तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मीना जगताप या पानसरे यांच्या घरी तळ ठोकून आहेत; तर पोलीस मुख्यालयातील पाच व राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पाच असे दहा सशस्त्र पोलीस चोवीस तास निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आले आहेत. या बंगल्यापासून काही अंतरावरच काही सराईत गुन्हेगारांचे वास्तव्य असलेला जवाहरनगर व सुभाषनगर परिसरातील गुन्हेगारांच्या हालचालींवर साध्या वेशातील पोलिसांचे विशेष पथक लक्ष ठेवून आहे. बंगल्यासभोवती असलेल्या सुरक्षारक्षकांची दोन शिफ्टमध्ये ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख हे रात्री उशिरापर्यंत या परिसरात तळ ठोकून होते. (प्रतिनिधी)