उमेश कत्तीना मंत्रिपद, विकासाच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:20 AM2021-01-15T04:20:49+5:302021-01-15T04:20:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : कर्नाटकात भाजपचे सरकार आल्यानंतर आठ वेळा विधानसभेवर निवडून आलेले आमदार उमेश कत्ती व माजी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : कर्नाटकात भाजपचे सरकार आल्यानंतर आठ वेळा विधानसभेवर निवडून आलेले आमदार उमेश कत्ती व माजी खासदार रमेश कत्ती यांना डावलण्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली होती. पण बुधवारी १३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात उमेश कत्ती यांची वर्णी लागली आहे. यामुळे कत्ती बंधू यांची नाराजी दूर करण्यात यश आले असले तरी काही आमदार मात्र नाराज आहेत. दरम्याऩ, बेळगाव जिल्ह्यात एकाच वेळी पाच मंत्रिपदे यावेळी मिळाली आहेत.
कर्नाटकच्या राजकीय इतिहासात बेळगावला पहिल्यांदाच बेंगलोर नंतर सर्वाधिक मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यातच उपमुख्यमंत्रिपद व पाटबंधारेसारखे वजनदार मंत्रिपदही बेळगाव जिल्ह्यातच असल्याने जिल्ह्याचा राजकीय आलेख वरचढ ठरला आहे. मुळात कर्नाटकात भाजप सरकार सत्तेवर येण्यासाठी बेळगाव जिल्हा महत्त्वाचा ठरला असल्याने यावेळी जिल्ह्याला मंत्रिपदाच्या बाबतीत अधिक प्राथमिकता मिळाली आहे. उमेश कत्ती हे हुक्केरी मतदार संघातून आठ वेळा निवडून आले आहेत. २००८ साली कर्नाटकात भाजप सत्तेवर येण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यावेळी त्यांना कृषिमंत्री पद देण्यात आले होते. २०१८ मधील निवडणुकीत त्यांनी परत बाजी मारली. पण भाजपने धक्कादायकरित्या उमेश यांना मंत्रिपदापासून लांब ठेवले होते.
यानंतर झालेल्या लोकसभेतही उमेश यांचे भाऊ माजी खासदार रमेश कत्ती यांना लोकसभेची उमेदवारी नाकारून पुन्हा पक्षाने धक्का दिला होता. यानंतर मात्र कत्ती गटामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. भविष्यातील कत्ती बंधूंच्या राजकीय हालचालींचा अंदाज घेऊन भाजपने मंत्रिपद त्यांच्या पारड्यात टाकले आहे.
सध्या बेळगाव जिल्ह्यात पाच मंत्रिपदे असून ही सर्व मंत्रिपदे महत्त्वाची आहेत. अजून खाते वाटप झालेले नसले तरी रमेश जारकीहोळी यांच्याकडे पाटबंधारे, श्रीमंत पाटील यांच्याकडे वस्त्रोद्योग तर शशिकला जोल्ले यांच्याकडे महिला व बालकल्याण ही महत्त्वाची खाती आहेत. लक्ष्मण सवदी हे उपमुख्यमंत्री असून आता कत्ती ही कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
विकासाच्या आशा पल्लवित
चार मंत्रिपदे जिल्ह्याला मिळाल्याने चिक्कोडी जिल्हा घोषणा, कराड निपाणी रेल्वे मार्ग, पाणी योजना अशा कामांची पूर्तता होईल अशी आशा जिल्ह्यातील जनतेला लागली आहे. उमेश कत्ती यांनी स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मध्यंतरी भूमिका घेतली होती. उत्तर कर्नाटकाकडे विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता मंत्रिपद मिळाल्याने त्यांच्याकडून उत्तर कर्नाटकात कोणती विकासकामे राबवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोटो
मंत्री उमेश कत्ती