उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:35 PM2020-06-24T16:35:01+5:302020-06-24T16:39:39+5:30
बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राम मगदूम
गडहिंग्लज : बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
१० वर्षांपूर्वी त्यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर त्यांना कॅबिनेटमंत्रीपदासह बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील मिळाले होते.परंतु, आता राज्यात भाजपची सत्ता येऊनदेखील मंत्रीमंडळात समावेश न झाल्याने ते गेल्या कांही महिन्यांपासून नाराज आहेत.
दरम्यान,कनिष्ठ बंधू माजी खासदार रमेश यांना राज्यसभेवर संधी मिळावी म्हणून त्यांनी फिल्डींग लावली होती. त्यासाठी 'उत्तर कर्नाटकातील आमदारांसाठी स्नेहभोजन' ठेवून त्यांनी नेतृत्वावर दबाव आणला होता.त्यावेळी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी मंत्री मंडळात स्थान देण्याचे त्यांना आश्वासन दिले होते.
सोमवारी (२२) हुक्केरी येथे 'विश्वराज ट्रस्ट'तर्फे आशा वर्कर्सना जीवनावश्यक वस्तू वाटपप्रसंगी त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला. त्यासाठीचा अनुभव व योग्यताही आपल्याकडे आहे, हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत.त्यांच्या या वक्तव्याने पावसाळ्यातही
कर्नाटकचे राजकारण तापले आहे.
कत्ती नेमकं काय म्हणाले..?
मी, ८ वेळा आमदार झालो,१३ वर्षे मंत्री होतो.त्यामुळे पुन्हा मंत्रीपद मिळेल, परंतु आता मला त्यात स्वारस्य नाही.तुमचा आशीर्वाद असेल तर उत्तर कर्नाटकचा सुपुत्र या राज्याचा मुख्यमंत्री होईल,असा विश्वास कत्ती यांनी व्यक्त केला.
'रमेश'ना डावलल्याची खदखद
लोकसभा निवडणुकीत भाजपने चिक्कोडी मतदार संघात रमेश कत्ती यांना डावलून आण्णासाहेब ज्वोल्ले यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी 'रमेश'ना राज्यसभेवर पाठविण्याचे आश्र्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात रमेश यांच्या ऐवजी गोकाकच्या ईराण्णा कडाडी यांना संधी दिली.
स्वतंत्र राज्याची मागणी
कर्नाटकच्या राजकारणात 'दक्षिण' आणि 'उत्तर' असा वाद पूर्वीपासूनच राहिला आहे. एस.आर.बोम्मई व जगदीश शेट्टर यांचा अपवाद वगळता उत्तर कर्नाटकाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालेली नाही.त्यामुळे उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची मागणी कत्तींनी यापूर्वीच केली आहे.