हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ‘उमेश’चे धवल यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:11 AM2019-05-30T11:11:43+5:302019-05-30T11:14:25+5:30
लक्ष्मीपुरीतील हॉटेलमध्ये आठ तास काम करून उमेश राजाराम खोत याने बारावीच्या परीक्षेत ८०.९२ टक्के गुणांसह धवल यश मिळविले आहे. त्याचे मूळ गाव पडखंबेपैकी खोतवाडी (ता. भुदरगड) असून कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे.
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील हॉटेलमध्ये आठ तास काम करून उमेश राजाराम खोत याने बारावीच्या परीक्षेत ८०.९२ टक्के गुणांसह धवल यश मिळविले आहे. त्याचे मूळ गाव पडखंबेपैकी खोतवाडी (ता. भुदरगड) असून कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उमेश याचे वडील हे गेल्या २0 वर्षांपासून कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये काम करत आहेत. त्या ठिकाणी ते राहतात. गावामध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणाची सोय नसल्याने उमेश आणि त्याचा भाऊ चार वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये आले.
मिस क्लार्क हॉस्टेल आणि कोरगावकर यांच्या विनयकुमार छात्रालयात ते विनामूल्य राहू लागले. शिक्षण, जेवणाचा खर्च भागविण्यासाठी दरमहा तीन हजार रुपये पगारावर उमेश हा हॉटेलमध्ये काम करू लागला. दिवसातील चार तास कॉलेज, चार तास अभ्यास आणि आठ तास हॉटेलमध्ये काम करून त्याने बारावीच्या परीक्षेत ८०.९२ टक्के गुण मिळविले आहेत. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्यासह प्राध्यापकांनी उमेशचे अभिनंदन केले.
सी. ए. होण्याचे ध्येय
शिक्षण घेताना कष्टाची लाज कधी बाळगली नाही. कोण, काय म्हणतील याकडे लक्ष दिले नाही. खोटी प्रतिष्ठाही बाळगली नाही. सी. ए. होण्याचे माझे ध्येय असल्याचे उमेश याने सांगितले.
यश डोंगराएवढे वाटते
मुलगा हॉटेलमध्ये काम करून शिकला. त्याचे यश आम्हाला डोंगराएवढे वाटत आहे. आई-वडिलांच्या परिस्थितीची त्याला जाणीव आहे. शहाजी महाविद्यालयाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळाल्याने त्याला हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया वडील राजाराम यांनी व्यक्त केली.