'भूसंपादन'च्या तत्कालीन लिपिकाकडे १९ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, लाचलुचपत विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:29 PM2022-05-05T17:29:37+5:302022-05-05T17:30:23+5:30
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश सूर्यवंशी व त्यांची पत्नी अर्चना सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आज, गुरुवारी गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागातील तत्कालीन लिपिकाने बेहिशेबी मालमत्ता संपादित केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत उघड झाले. सतीश गणपतराव सूर्यवंशी (रा. प्लॉट नं. ५९, श्री बंगला, दिंडेनगर हौसिंग सोसायटी, पाचगाव, कोल्हापूर) असे या लिपिकाचे नाव आहे.
चौकशीमध्ये त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतपेक्षा एकूण १९ लाख ७८ हजार ६६१ रुपये बेहिशेबी मालमत्ता केली असून, त्याचे प्रमाण हे १७.६८ टक्के असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश सूर्यवंशी व त्यांची पत्नी अर्चना सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आज, गुरुवारी गुन्हा दाखल केला.
याबाबत माहिती अशी, सतीश सूर्यवंशी हे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात लिपिक या पदावर कार्यरत आहेत. याआधी ते भूसंपादन विभागात कार्यरत होते. लिपिक सूर्यवंशी यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार
मालमत्तेची झडती घेतली असता सूर्यवंशी व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा १९ लाख ७८ हजार ६६१ रुपयांची (१७.६८ टक्के) बेहिशेबी मालमत्ता संपादित केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
तसेच सूर्यवंशी यांना त्यांच्या पत्नी अर्चना सूर्यवंशी यांनी सहाय्य केल्याने दोघांवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने पो. नि. कुंभार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या घराची व इतर संपादित मालमत्तेची झडती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.