मनगुत्तीमध्ये अघोषित संचारबंदी, पोलिसांचा वेढा : ग्रामस्थ भितीच्या छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 04:55 PM2020-08-11T16:55:51+5:302020-08-11T17:24:40+5:30
संपूर्ण मनगुत्ती गावाला कर्नाटक पोलिसांनी वेढाच दिला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी वेळोवेळी दडपशाही केल्यामुळे मनगुत्ती ग्रामस्थही भितीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे मनगुत्तीमध्ये तणावपूर्ण शांतता व अघोषित संचारबंदीच असल्याचे चित्र सोमवारी (१०) रोजी पहायला मिळाले.
राम मगदूम
मनगुत्ती (जि. बेळगांव) - संपूर्ण मनगुत्ती गावाला कर्नाटक पोलिसांनी वेढाच दिला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी वेळोवेळी दडपशाही केल्यामुळे मनगुत्ती ग्रामस्थही भितीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे मनगुत्तीमध्ये तणावपूर्ण शांतता व अघोषित संचारबंदीच असल्याचे चित्र पहायला मिळाले.
बुधवार (५) रोजी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छ. शिवरायांचा पुतळ्याला गावातील एका गटाने विरोध केल्यामुळे शुक्रवारी (७) रात्री तो पुतळा चबुतऱ्यावरून उतरविण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मनगुत्तीमध्ये येवून चबुतºयाच्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर तैनात सशस्त्र पोलिस बंदोबस्तामुळे मनगुत्तीला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावरच पश्चिमेला हे गाव आहे. सुमारे ८ हजार लोकवस्तीच्या गावातील जवळपास ७५ टक्के लोक मराठी बोलतात. त्यामुळे बेळगावच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेकडो पोलिसांसह मनगुत्ती गावात तळ ठोकला आहे. गावातील बहुतेक सर्व व्यवहार बंद होते.
मनगुत्तीच्या वेशीवरच पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले असून गावात जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. कळविकट्टी, दड्डी व हत्तरगीकडून गावात येणाऱ्या रस्त्यांवरही पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.
शिवाजी चौकातील चबुतऱ्यावरून हटविण्यात आलेला छ. शिवरायांचा पुतळा जुन्या चावडीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चबुतरा परिसरासह ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभोवतीदेखील बंदोबस्त तैनात आहे.
येळ्ळूर घटनेची आठवण
जुलै २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्य येळ्ळूर असा मजकूर लिहिलेला फलक न्यायालयाच्या आदेशाने हटविण्यात आला. मराठी भाषिकांच्या अस्मितेचे प्रतिक असणारा तो फलक पुन्हा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांना कर्नाटकी पोलिसांनी घरा-घरात घुसून मारहाण केली होती. त्याच पद्धतीने मनगुत्तीमध्ये शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्याची मागणी करणाऱ्या महिलांना कन्नडीगांकडून मार खावा लागला. त्यामुळे सीमाभागातील मराठी बांधवांना येळ्ळूरच्या घटनेची आठवण झाली.
जिथे होता तिथेच बसवा
छ. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ज्या चबुतऱ्यावरून हटविण्यात आला. त्याच ठिकाणी सन्मानपूर्वक तो पुतळा पुन्हा बसविण्यात यावा, अशी मागणी त्या पुतळ्यासाठी पोलिसांचा मार खालेल्या महिला आणि तरूणांनी केली.
अधिकाऱ्यांना माध्यमांचे वावडे
बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुखांसह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मनगुत्तीमध्ये ठाण मांडून होते. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. परंतु, मनगुत्ती घटनेबद्दल कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी ठामपणे नकार दिला.
संकेश्वरनजीक रस्ता अडविला
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवप्रेमी मनगुत्तीकडे जावू नयेत म्हणून कर्नाटक पोलिसांनी संकेश्वर-नांगनूर मार्गावर मातीचा बांध घालून रस्ता बंद केली आहे.