नामंजूर... नामंजूर... मल्टिस्टेट नामंजूर; विरोधकांची समांतर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:52 AM2018-10-01T00:52:38+5:302018-10-01T00:52:43+5:30

Unapproved ... unapproved ... multistat not approved; Parallel assembly of opponents | नामंजूर... नामंजूर... मल्टिस्टेट नामंजूर; विरोधकांची समांतर सभा

नामंजूर... नामंजूर... मल्टिस्टेट नामंजूर; विरोधकांची समांतर सभा

Next

कोल्हापूर : विरोधकांनी समांतर सभा घेऊन गोकुळ दूध संघाच्या ‘मल्टिस्टेट’चा ठराव रविवारी नामंजूर केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी विरोधी गटातील नेते, कार्यकर्ते आणि दूध उत्पादक सभासदांनी हात उंचावून मल्टिस्टेटच्या विरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार शपथ घेऊन केला.
ताराबाई पार्क येथील पितळी गणपती चौकात सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून विरोधकांनी समांतर सभा घेतली. अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते. आमदार सतेज पाटील म्हणाले, सर्वसामान्य दूध उत्पादकांचा जिल्हा दूध संघ वाचविण्यासाठी मल्टिस्टेटच्या विरोधात आम्ही लढा सुरू केला आहे. आता हा लढा थांबणार नाही. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, दोन हजार सभासदांनी सभेत घुसून कोल्हापुरात कुणाची दादागिरी चालत नसल्याचे दाखवून दिले. सत्ताधाºयांनी लोकभावना लक्षात घेऊन मल्टिस्टेटचा निर्णय रद्द करावा. आजचा केवळ ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, सत्ताधाºयांनी आज जे वर्तन केले आहे, ते निषेधार्ह आहे. पालकमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी सर्वसामान्यांच्या डोक्यावर वरवंटा फिरविण्याचे काम करू नये. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक म्हणाले, जिल्ह्यातील स्वाभिमानी दूध उत्पादकांनी आज सभेत घुसून आपले अस्तित्व सत्ताधाºयांना दाखविले आहे. मल्टिस्टेटला तीव्र विरोध केला जाईल. या सभेत माजी आमदार के. पी. पाटील यांनी मल्टिस्टेटच्या ठरावाचे वाचन केले. हा ठराव उपस्थित दूध उत्पादकांनी नामंजूर केला. यावेळी ए. वाय. पाटील, प्रवीणसिंह पाटील, विश्वास नेजदार, राजेंद्र गड्ड्यान्नावार, बाबासो देवकर, अंजनाताई रेडेकर, रमा बोंद्रे, सरदार पाटील, सर्जेराव पाटील, विजयसिंह मोरे, अजित नरके, संग्रामसिंह कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, संजय जाधव, बाबासाहेब पाटील, बाबासो चौगुले, प्रताप माने, सत्यजित जाधव, ऋतुराज पाटील, वीरेंद्र मंडलिक, राजेखान जमादार, आदी उपस्थित होते.
आता खरी लढाई सुरू
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, सत्ताधाºयांच्या बाजूने ठराव दिलेल्यांच्या घरी श्रीखंड, तूप पोहोचविण्यात आले आहे. मल्टिस्टेट झाल्यास, हे शेवटचेच असेल हे त्यांनी लक्षात घ्यावे. मल्टिस्टेट विरोधातील आमची लढाई दूध उत्पादकांच्या आत्मसन्मानाची आहे. आमच्यावर विश्वास ठेवा. सत्तांतर झाल्यास आम्ही लिटरला १0 रुपये जादा देऊ. मल्टिस्टेट करणाºयांना आगामी निवडणुकीत जनताच जागा दाखवेल. आम्ही सभेत घुसल्यानंतर सत्ताधाºयांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. आता लढाई सुरू झाली आहे.
संघाचा ‘चिवडा’ करू देणार नाही
या सभेत माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, दोन हजार सभासदांच्या उपस्थितीत झालेली आमची समांतर सभा अधिकृत असून, सत्ताधाºयांची सभा अनधिकृत आहे. त्यामुळे या समांतर सभेद्वारे ‘मल्टिस्टेट’चा ठराव नामंजूर करीत आहोत. सत्ताधाºयांनी सभेसाठी चिवडादेखील चिकोडीतून आणला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिल्हा दूध संघाचा ‘चिवडा’ होऊ देणार नाही.
पोलीस बळ अपुरे पडले : पी.एन.
सभामंडपात पोलीस बळ अपुरे पडले; त्यामुळेच सभासद नसणाºया लोकांना घेऊन विरोधक सभेत आल्याची टीका सत्तारूढ गटाचे नेते पी. एन. पाटील यांनी सभेनंतर बोलताना केली. ते म्हणाले, ‘संघाच्या ९० टक्के सभासदांचा आम्हाला पाठिंबा आहे. ही सभा संचालक मंडळाने चांगल्या रीतीने हाताळली. सभा पूर्णवेळ चालवायचीच आमची तयारी होती. विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. त्यांच्याकडे सभासद कमी आहेत, हे त्यांना माहीत असल्यानेच गोंधळ घातला.
‘गोकुळ आमच्या हक्काचे...’
जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी रविवारी गोकुळ बचाव कृती समिती आक्रमक झाली. पहिल्यांदा ठिय्या, त्यानंतर सभेत घुसणे आणि समांतर सभा घेऊन या समितीचे नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या बाजूने असलेल्या दूध उत्पादकांनी ‘मल्टिस्टेट’च्या मुद्द्यावरून तीव्र विरोध दर्शविला.
या सभेला जाण्यासाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून गोकुळ बचाव कृती समितीचे नेते, कार्यकर्ते आणि समितीच्या बाजूने असणारे दूध उत्पादक, संस्था पदाधिकारी, प्रतिनिधी हे ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क येथे येऊ लागले. या ठिकाणी समितीच्या नेत्यांनी चर्चा करून सभेबाबतची रणनीती निश्चित केली. आपल्याला सभास्थळी एका बाजूला बसण्यासाठी जागा देण्याची मागणी करूया, आपले प्रश्न मांडूया, असे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर कृती समितीचे सर्व नेते, कार्यकर्ते आणि दूध उत्पादक साडेनऊच्या सुमारास जिल्हा दूध संघाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले. ‘मल्टिस्टेट नको, नको....’, ‘गोकुळ आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, आदी घोषणा देत होते. कार्यालयाच्या अलीकडे काही अंतरावर त्यांनी ठिय्या मारला. सभेला आत सोडत नसल्याचे पाहून कृती समितीचे नेते, कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने धडक मारली. त्या ठिकाणी पुन्हा ठिय्या मारला.

Web Title: Unapproved ... unapproved ... multistat not approved; Parallel assembly of opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.