खुल्या जागेतील अनधिकृत बांधकाम तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:31 AM2021-02-17T04:31:00+5:302021-02-17T04:31:00+5:30
कोल्हापूर : टेंबलाई टेकडीजवळील महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर झालेले दोन हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम अखेर मंगळवारी महापालिकेने तोडले. या ...
कोल्हापूर : टेंबलाई टेकडीजवळील महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर झालेले दोन हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम अखेर मंगळवारी महापालिकेने तोडले. या परिसरातील नागरिकांनी गेल्या दहा वर्षांपासून या अनधिकृत बांधकामाविरुद्ध तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला.
प्रगती सहकारी गृहनिर्माण संस्थेने १९८३ साली गृह प्रकल्प राबविल्यानंतर संस्थेच्या मालकीची ३२ हजार स्क्वेअर फूट जागा महापालिकेकडे वर्ग केली होती; परंतु ही जागे महापालिकेने आपल्या सात बारा पत्रकी नोंद करून घेतली नव्हती. त्याचा गैरफायदा घेत या जागेवर रवींद्र मुतगी यांच्या आईंनी त्यांच्या प्लॉटला लागून असलेल्या खुल्या जागेवरील दोन हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम केले होते. त्याच्या विरोधात तेथील नागरिकांनी तक्रारी केल्या. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. त्यानंतर न्यायालयात महापालिकेने बाजूच मांडली नाही. त्यामुळे एकतर्फी स्थगिती मिळाली होती; परंतु तक्रारदार नागरिकांनी प्रयत्न सोडले नाहीत. ही स्थगिती उठविण्याचे प्रयत्न केले.
अखेर मंगळवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार विभागीय कार्यालयाने सदरचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत बरेच बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतर उर्वरित बांधकाम आम्ही उतरवून घेतो, असे मुतगी यांनी लिहून दिले.