Kolhapur: पावनगडावरील मदरसा मध्यरात्री जमीनदोस्त, कारवाईबाबत गुप्तता; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:20 AM2024-01-06T11:20:47+5:302024-01-06T11:24:44+5:30
मध्यरात्री मदरसा जमीनदोस्त करण्यात आला
नितीन भगवान
पन्हाळा : पन्हाळा गडावरील पावनगड येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाच्यावतीने गुप्तता पाळत जमीनदोस्त करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनेकडून मदरसाबाबत काही तक्रारी प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने त्याची कारवाई प्रशासकीय पातळीवर गेले आठवडाभर गुप्ततेने सुरू होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काल, शुक्रवारी रात्री प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. मध्यरात्री नंतर हा मदरसा जमीनदोस्त करण्यात आला.
छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पावनगडावर सध्या संपुर्ण मुस्लिम वस्ती आहे. याचा गैरफायदा घेत १९७९ साली सय्यद या आडनावाच्या इसमाने बेकायदेशीर मदरसा बांधला. सद्यस्थितीत याठिकाणी पश्चिम बंगाल व बिहार मधील ४५ मुले शिक्षण घेत होती. गुरुवारी सायंकाळी येथील सर्व मुलांना शिरोली येथील मदरसा येथे नेण्यात आले. त्यानंतर मदरसा पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. मदरसा सुमारे दोन गुंठे क्षेत्रामध्ये बांधला गेला होता. हे क्षेत्र महसूलच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
मदरसा पाडण्यास प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळत गुरुवारी सायंकाळी सुमारे चारशे पोलिसाचा बंदोबस्त बुधवार पेठ ते पावनगड पर्यंत ठेवण्यात आला होता. यात पन्हाळा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक ठाण मांडून बसले होते. मदरसा पाडण्याची तसेच तेथील साहित्य काढण्याची कारवाई अजूनही सुरू आहे.