विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन सुरू-कोल्हापूर जिल्ह्यातील ११६ शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:37 PM2018-11-19T16:37:14+5:302018-11-19T16:39:37+5:30
प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही.
कोल्हापूर : प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही. याबाबत सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे सोमवारपासून शाळा बंद आंदोलन सुरू झाले. त्यासह समितीने मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
पावसाळी अधिवेशनामध्ये २० जुलै २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी २० टक्के अनुदानपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबत आणि अघोषित सर्व शाळा निधींसह घोषित करण्याबाबत निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन शासनाने पाळावे आणि हजारो शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, अशी अपेक्षा होती; परंतु, या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी सुरू केले. त्यात राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक हे शाळा बंद ठेवून सहभागी झाले. दिवाळीच्या सुट्टीनंतर सोमवारपासून या शाळा सुरू होणार होत्या; मात्र, या आंदोलनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा सुट्टी मिळाली आहे. इयत्ता दहावी आणि शिष्यवृत्तीचे जादा तासदेखील या आंदोलनाअंतर्गत बंद करण्यात आले आहेत.
या आंदोलनात राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक सहभागी झाले आहेत. मुंबईतील आंदोलनात कोल्हापूरमधील सुमारे ३00 शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील ११६ शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शहरातील ४० आणि ग्रामीण भागातील ७६ शाळांचा समावेश आहे. मागण्यांबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक कार्यवाही होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.
- खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती