अंबाबाई मंदिर परिसरातील अपरिचित ‘दुर्वास गणपती’

By Admin | Published: September 19, 2015 12:01 AM2015-09-19T00:01:48+5:302015-09-19T00:03:14+5:30

सन १८७० मध्ये वासुदेव यज्ञेश्वर दीक्षित हे कोकणातून कोल्हापुरात राहण्यासाठी आले. त्यांना या काळात अंबाबाई मंदिराच्या परिसरात पाषाणातील पायाजवळ दुर्वास ऋषींची मूर्ती असलेला गणपती दृष्टिक्षेपास पडला.

Unbelievable 'Durvas Ganapati' in Ambabai temple area | अंबाबाई मंदिर परिसरातील अपरिचित ‘दुर्वास गणपती’

अंबाबाई मंदिर परिसरातील अपरिचित ‘दुर्वास गणपती’

googlenewsNext

सचिन भोसले -कोल्हापूर--श्री गणेशाचे वाहन म्हणून मूषक अर्थात उंदराला मोठे स्थान आहे. गणेशमूर्तीसमोर मूषकाचे स्थान कायम असते. मात्र, अंबाबाई परिसरातील तुळजाभवानी मंदिराशेजारी विनायक दीक्षित यांच्या अधिपत्याखाली पूजन होत असलेल्या, उंदरावर स्थानापन्न झालेल्या ‘दुर्वास गणेश’ची गोष्टच निराळी. हा दुर्वास गणेशही गेली अनेक वर्षे भक्तांपासून अपरिचितच राहिला आहे. सन १८७० मध्ये वासुदेव यज्ञेश्वर दीक्षित हे कोकणातून कोल्हापुरात राहण्यासाठी आले. त्यांना या काळात अंबाबाई मंदिराच्या परिसरात पाषाणातील पायाजवळ दुर्वास ऋषींची मूर्ती असलेला गणपती दृष्टिक्षेपास पडला. त्यांनी तो आपल्याकडेच ठेवून ‘आपला देव’ म्हणून त्याच्या पूजेला सुरुवात केली. कालांतराने या गणेशाची प्रतिष्ठापना त्यावेळी अंबाबाई मंदिरातील छोट्या मंदिरात करण्यात आली. तेथून पुढे आजतागायत या गणेशाच्या पूजनाचा मान दीक्षित कुटुंबीय यांच्याकडेच आहे.सध्या दीक्षित यांची पाचवी पिढी या गणेशमूर्तीची मनोभावे सेवा करीत आहे. ही सुबक गणेशमूर्ती काळ्या पाषाणात असून, मूषकावर आरूढ झालेली आहे. मूर्तीच्या पायांजवळ दुर्वास ऋषींची मूर्ती पहायला मिळते. ही गणेशमूर्ती सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची असल्याचे जाणकार अभ्यासकांचे मत आहे. याचबरोबर या मूर्तीशेजारी पंचधातूंमधील दशभूजा गणेशाची मूर्तीही पहायला मिळते. या मूर्तीच्या मांडीवर सिद्धी आहे. ही मूर्तीही अनेक वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते.
दोन्ही मूर्ती गणेशभक्तांपासून गेली अनेक वर्षे दूर राहिल्या आहेत. या गणेशाच्या दर्शनासाठी अंबाबाई मंदिरातील विद्यापीठ हायस्कूलच्या दरवाजातून पायऱ्या उतरून आत जावे लागते. पुढे गेल्यानंतर तुळजाभवानी मंदिराजवळ दुर्वास गणपतीचे मंदिर आहे. काही जाणकार गणेशभक्तच या दुर्वास गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून जाताना दिसतात.

Web Title: Unbelievable 'Durvas Ganapati' in Ambabai temple area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.