महात्मा गांधींच्या मुत्सद्देगिरीमुळे अखंड भारत : शेषराव मोरे
By admin | Published: December 2, 2015 01:05 AM2015-12-02T01:05:34+5:302015-12-02T01:07:49+5:30
--तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला
कोल्हापूर : महात्मा गांधी यांना द्विराष्ट्रवाद मान्य नव्हता; पण ऐक्य पाहिजे होते. त्यांच्या या मुत्सद्देगिरीमुळे अखंड भारत राहिला, असे मत नांदेड येथील शेषराव मोरे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. ते येथील तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘गांधीजी व काँग्रेसने अखंड भारत का नाकारला?’ या विषयावर बोलत होते. श्री महालक्ष्मी को-आॅप. बँक व ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम यांच्यावतीने व्याख्यानमालेचे आयोजन प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात करण्यात आले आहे.
शेषराव मोरे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजे १९४०च्या सुमारास आपली सत्ता जाणार, असे इंग्रजांना वाटू लागले. ही सत्ता कोणाच्या हाती द्यावी, हे कोडे इंग्रजांना पडले. त्यावेळी काँग्रेसचे महात्मा गांधी व मुस्लिम लीगचे बॅरिस्टर जिना हे नेते होते. गांधीजींना द्विराष्ट्रवाद नको होता. त्यांना ऐक्य पाहिजे होते.
द्विराष्ट्रवाद हा फाळणीच्या विरोधात आहे, हे गांधीजींना मान्य नव्हते. सत्तेच्या समान वाटणीसाठी व चांगल्या हेतूने लखनौ करार झाला. या करारामध्ये घटना कशी असावी, यावर जिना व गांधी यांच्यात चर्चा झाली. कोणताही प्रदेश घोषित अथवा प्रस्थापित लोकांनी सक्तीने करू नये व ज्याला कोणत्या प्रांतात राहायचे असेल तर त्या ठिकाणी त्याने राहावे. त्याच्यावर कोणतीही सक्ती करू नये, असे गांधी यांचे मत होते. फाळणीच्या कारणावरून गांधी व जिना यांच्यामध्ये चर्चा झाली. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये प्रांतिक विधिमंडळात मुस्लिमांना ५० टक्के वाटा पाहिजे, केंद्रीय अथवा प्रांतिकमध्ये ५० टक्के मंत्री असावेत, नागरी सेवेमध्ये व सैन्यामध्ये प्रत्येकी ५० टक्के वाटा असावा, कोणताही ठराव करताना दोन-तृतीयांश सदस्यांची मान्यता असली पाहिजे, अशा अनेक अटी घातल्या. हे गांधींना मान्य झाले नाही. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला.