शंभर वर्षांपासून देशसेवेची अखंड परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:07+5:302021-09-02T04:53:07+5:30

* महाराष्ट्र बुक आॅफ रेकॉर्डने घेतली नोंद सैनिक टाकळी येथील जाधव कुटुंबीयांतील १४ सैनिक दत्तवाड : सैनिक टाकळी (ता. ...

An unbroken tradition of national service for a hundred years | शंभर वर्षांपासून देशसेवेची अखंड परंपरा

शंभर वर्षांपासून देशसेवेची अखंड परंपरा

Next

* महाराष्ट्र बुक आॅफ रेकॉर्डने घेतली नोंद

सैनिक टाकळी येथील जाधव कुटुंबीयांतील १४ सैनिक

दत्तवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील जाधव (सुभेदार) कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गेल्या शंभर वर्षांत भारतीय सैन्यामध्ये एकाच कुटुंबातील चौदा सैनिक देणारे ते वैशिष्ट्यपूर्ण कुटुंब ठरले आहे.

येथील रावसाहेब मालोजीराव जाधव हे पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते. ते टाकळी गावातील पहिले सुभेदार होते. त्यांच्या पश्चात या कुटुंबाला ‘सुभेदार’ या टोपणनावाने ओळखले जाऊ लागले. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचा मुलगा ज्ञानदेव जाधव यांनी सहभाग घेतला होता. ते सुभेदार मेजर पदावर कार्यरत होते. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रभावित होऊन इंग्रजांच्या नोकरीचा त्याग केला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. त्यांचाही मुलगा बापूराव जाधव यांनी सन १९६५ व सन १९७१ च्या भारत-पाक युद्धात भाग घेतला होता. त्यांचा मुलगा भरतकुमार जाधव बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये नाईक पदावर होते. त्यांनी सन १९८४ पासून २००१ पर्यंत देशसेवा केली. सध्या सुभेदार कुटुंबामधील पाचव्या पिढीतील अक्षय भरतकुमार जाधव हाही सन २०१६ पासून शिपाई या पदावर भरती झाला आहे.

सन १९१४ पासून २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे हे महाराष्ट्रातील उल्लेखनीय कुटुंब ठरले आहे. त्याबद्दल सुभेदार कुटुंबांचे प्रतिनिधी भरतकुमार जाधव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डसचे चीफ एडिटर डॉ. सुनील पाटील यांनी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुदर्शन भोसले, मधुकर पाटील, विनोद पाटील, सुनीता पाटील, मनोहर भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: An unbroken tradition of national service for a hundred years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.