पदाधिकारी निवडीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

By admin | Published: April 13, 2016 11:46 PM2016-04-13T23:46:55+5:302016-04-13T23:56:20+5:30

एकमत होणे कठीण : जिल्हाध्यक्षांचा चार-पाच दिवसांत निर्णय

Uncertainty in Congress by choosing the office bearer | पदाधिकारी निवडीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

पदाधिकारी निवडीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

Next

कोल्हापूर : कॉँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेऊन राज्य कार्यकारिणीची निवड केली. पण, निवडीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख व पतंगतराव कदम यांच्या गटाला डावलल्याची चर्चा सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सहाजणांना संधी दिली तरी काँग्रेस अंतर्गत अस्वस्थता वाढली आहे. येत्या चार-पाच दिवसांत जिल्हाध्यक्षांबाबत वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय होण्याची शक्यता आहे.
कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून पी. एन. पाटील यांनी १७ वर्षे काम केल्याने आपणाला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह आमदार सतेज पाटील हेही इच्छुक असून, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पी. एन. पाटील यांना कायम ठेवावे, असा एक प्रवाह कॉँग्रेसतंर्गत सुरू होता. पंधरा दिवसांपूर्वी याबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेतल्यानंतर मंगळवारी थेट दिल्लीतूनच प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये पी. एन. पाटील, मालोजीराजे छत्रपती यांना प्रदेश सरचिटणीस, तौफिक मुल्लाणी, प्रकाश सातपुते यांना सचिव, तर ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार सतेज पाटील, जयवंतराव आवळे यांना कार्यकारिणीत घेतले आहे. पण, सरचिटणीस म्हणून काम करण्यास पी. एन. पाटील नाखूश आहेत. त्याचबरोबर मालोजीराजे छत्रपती यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसकडे पाठ फिरवली असताना त्यांची वर्णी लावून जिल्ह्यातील कॉँग्रेस नेत्यांना प्रदेशाध्यक्षांनी धक्काच दिला आहे. अ‍ॅड. सुरेश कुराडे यांनी, दहा वर्षांपेक्षा अधिक काळ युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यात बांधलेली युवकांची मोट कमालीची होती. गेले आठ वर्षे ते प्रदेश सरचिटणीस म्हणून कॉँग्रेस पक्षात आक्रमकपणे काम केले, तरीही त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यापुरतेच नव्हे, तर राज्य कार्यकारिणीत सातारा जिल्ह्यातील एकाही नेत्याला संधी दिलेली नाही. ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनाही कार्यकारिणीत फारसे स्थान दिलेले दिसत नाही. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीवरून काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना प्रदेशवर पाठवून जिल्हाध्यक्ष बदलणार हे निश्चित झाले आहे, त्यानुसार आवाडे व सतेज पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू असली तरी जिल्हाध्यक्ष निवडीत पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाटील व आवळे यांचा आवाडे यांना उघड विरोध असला तरी ते सतेज पाटील यांच्यासाठी ताकद लावतील, असेही म्हणता येणार नाही. जिल्हाध्यक्ष पदावर एकमत होणे कठीण असल्याने श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात तो आगामी जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत पक्षाला तारक ठरणार की मारक याचे उत्तर काळच देईल.

Web Title: Uncertainty in Congress by choosing the office bearer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.