विस्कळीत सुट्यांमुळे शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:02 AM2018-05-07T01:02:02+5:302018-05-07T01:02:02+5:30

Uncertainty in the field of education due to disruptions | विस्कळीत सुट्यांमुळे शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता

विस्कळीत सुट्यांमुळे शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता

Next



राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्राथमिक, माध्यमिक व महापालिका शाळांच्या सुट्यांमध्ये यंदा कमालीचा विस्कळीतपणा पाहावयास मिळत आहे. खासगी व माध्यमिक शाळांची १ मे, प्राथमिक शाळांची ५ मे, तर महापालिकांच्या शाळांची १२ मेपासून सुटी सुरू होत आहे. पेपर संपल्यापासून म्हणजेच १५ एप्रिलनंतर विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे; त्यामुळे जवळपास महिनाभर विद्यार्थ्यांविनाच शिक्षकांना शाळेत हजर राहण्याची एकप्रकारची शिक्षाच दिल्याने शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता आहे.
सर्वांत जास्त सुट्या या शाळांना असतात. विद्यार्थी हा उत्सवप्रिय असल्याने सण, जयंत्या, उत्सवानिमित्त सुट्या दिल्या जातात. दीपावलीसाठी पंधरा ते एकवीस दिवसांपर्यंत सुटी असते. त्यानंतर उन्हाळ्याची सुटी मोठी असते. महाराष्टÑात फेब्रुवारी-मार्चपासून कडक उन्हाळ्यास सुरुवात होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सकाळची शाळा सुरू होते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाळा अधिक तीव्र होत असल्याने तत्पूर्वीच परीक्षा घेतली जाते. आपल्याकडे महाविद्यालयीन वगळता १५ एप्रिलच्या आत विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण होतात. परीक्षा संपली की मुले शाळेकडे पाठ फिरवितात. त्यात शिक्षकांना निकालासह इतर कामे करायची असल्याने तेही विद्यार्थ्यांना सक्ती करीत नाहीत.
पंधरा दिवसांत निकाल तयार होऊन १ मे रोजी निकालपत्रे देऊन सुटी सुरू आणि १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायचे.
अलीकडे शिक्षण विभागाने या वेळापत्रकात बदल केला आहे. यंदा खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे निकाल १ मे रोजी लागले; पण जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांचे निकाल ५ मे रोजी जाहीर झाले; तर त्यापेक्षा कहर म्हणजे महापालिकांतर्गत येणाºया शाळांचे निकाल १२ मे रोजी जाहीर करण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे. किमान या शाळा एकाच वेळी सुरू करण्याची अपेक्षा होती; पण खासगी शाळा ५ जून रोजी, तर माध्यमिक, प्राथमिक शाळा १५ जून रोजी सुरू होत आहेत. महापालिकेच्या शाळा तर २१ जूनला सुरू होणार आहेत. विस्कळीत सुट्यांमुळे शिक्षण क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पाहावयास मिळत असून १ मे रोजी निकाल आणि १५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात व्हावी, अशी मागणी होत आहे.
वर्षभरात ७६ सुट्या
शाळांना रविवारच्या सुट्या सोडून उन्हाळी, दीपावलीसह इतर ७६ सुट्या असतात. त्यांचे नियोजन शिक्षण विभागाने करावयाचे असते. पेपर संपल्यापासून म्हणजे १५ एप्रिलपासून २१ जूनपर्यंत सव्वादोन महिने मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून बाजूला फेकली जातात. प्रदीर्घ सुटीनंतर त्यांना पूर्ववत होण्यास महिन्याभराचा कालावधी लागत असल्याने यामध्ये विद्यार्थ्यांचेही नुकसान आहे.

Web Title: Uncertainty in the field of education due to disruptions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.