जिल्ह्यातील शुगर लॉबीत अस्वस्थता

By Admin | Published: November 3, 2014 09:31 PM2014-11-03T21:31:27+5:302014-11-03T23:32:40+5:30

साखर उद्योगापुढे संकट : ऊसदर, ऊसतोड मजुरांसह साखर कामगारांचा संप

Uncertainty in Sugar lobby in the district | जिल्ह्यातील शुगर लॉबीत अस्वस्थता

जिल्ह्यातील शुगर लॉबीत अस्वस्थता

googlenewsNext

प्रकाश पाटील - कोपार्डे -साखर कारखानदारीतील सत्तेच्या जिवावर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रावरही वर्चस्व निर्माण करणाऱ्या कारखानदारांना विधानसभा निवडणुकीत जनतेने साफ नाकारल्याने कारखानदारांत नाराजी असतानाच ऊसदर, ऊसतोड मजुरांबरोबर साखर कामगारांच्या संपाच्या एल्गाराने जिल्ह्यातील शुगर लॉबीत अस्वस्थता पसरली आहे. कारखाने वेळेत सुरू झाले नाहीत, तर त्याचा आर्थिक भुर्दंड कारखान्यांबरोबर शेतकऱ्यांनाही बसणार आहे.
जिल्ह्यात २१ साखर कारखाने आहेत. यावर्षी यामध्ये नव्या दोन साखर कारखान्यांची भर पडली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कारखानदारांशी संबंधित असणारे आठ उमेदवार विधानसभेच्या रिंंगणात होते. मात्र, यापैकी आमदार चंद्रदीप नरके वगळता सर्वच कारखानदारांना अपयश आल्याने कारखानदारीच्या क्षेत्रात नाराजीचा प्रवाह सुरू असतानाच कारखान्याचे बॉयलर प्रदीपन करून गाळप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे.
गाळप हंगामाची तयारी सुरू झाली असली तरी ऊसदरावरून शासन, कारखानदार व शेतकरी संघटनांत समेट घडणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. संघटनेच्या भूमिकेवरच हंगामासाठी कारखान्याची चाके फिरू शकतात, अन्यथा ऊसदराचा निर्णय ताणला गेला, तर गाळप हंगाम सुरू होण्याबाबत अनिश्चितता निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी हंगाम सुरू करण्यासाठी पूर्ण नियोजन केले असून, जर वेळेवर हंगाम सुरू झाला नाही, तर मोठा आर्थिक फटका कारखान्यांना सोसावा लागणार आहे.
ऊसतोड मजूर व साखर कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसल्याने कारखानदारांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.
शुगरलॉबीवर वर्चस्व असणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार बाजूला झाल्याने व साखर उद्योगातील विविध प्रश्नांची जाण असणारे भाजपमधील गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेतृत्व नसल्याने अशा विविध प्रश्नांवर सध्याचे भाजप सरकार काय तोडगा काढणार, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्ह्यातील साखर उद्योगाची परिस्थिती
साखर कारखाने : २३ (खासगी : ७, सहकारी : १६)
उसाचे एकूण क्षेत्र : १ लाख ४६ हजार हेक्टर
गाळपासाठी उपलब्ध ऊस : १ कोटी १० लाख टन
एकूण साखर कामगार : ३० हजार
ऊसतोड मजूर : ७५ हजार
जिल्ह्यातील कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता : ७५ हजार मे. टन.

Web Title: Uncertainty in Sugar lobby in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.