माध्यमिकचा ‘चाचा’च ‘कलेक्टर’
By admin | Published: January 16, 2016 12:02 AM2016-01-16T00:02:04+5:302016-01-16T00:14:12+5:30
अधिकाऱ्यांचा आशीर्वाद : सौदा ठरविण्यात आघाडीवर
शिक्षणातील ‘चोर बाजार’
भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर
माध्यमिक शिक्षण विभागातील ‘चाचा’ खाबुगिरीतील कलेक्टर आहे, हे जगजाहीर आहे. लाच घेण्याचा सौदा तेच ठरवितात. आपला वाटा काढून वरिष्ठांपर्यंत प्रामाणिकपणे सहीसलामत पोहोच करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना आतापर्यंतच्या सर्वच अधिकाऱ्यांचा आशीर्वाद राहिला आहे. कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत साऱ्यांची कुंडली त्यांना माहीत आहे.
शासन नियमानुसार कामकाज न चाललेल्या संस्थांवर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार माध्यमिक शिक्षण विभागाला आहे; पण बहुतांशी शिक्षणसंस्था आजी-माजी राजकीय नेत्यांच्या संबंधित असतात. त्यामुळे कारवाई करण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून मलई गोळा केली जाते. कारवाईचा विषय आल्यानंतर कागदोपत्री घोडे नाचवायची व मलई मिळणार असली तर नियम, कायद्यातील पळवाटा शोधून काम करायचे, असा कारभार आहे. लाचेचा दर महिन्याचा लाखोंचा व्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे. कामापेक्षा ‘लक्ष्मी’ गोळा करण्यात ‘पळा पळा कोण पुढे’ अशीच शर्यत सुरू असते.
‘चाचा’ सांगलीत असताना अनेक कारनामे केले. काळ्याकुट्ट कारकिर्दीमुळे त्यांची उचलबांगडी कोल्हापुरात झाली. त्यांना शासनाचे नियम, कायदे आणि समोरच्या व्यक्तीस गोड बोलून गुंडाळण्याचे उत्तम ज्ञान आहे. अर्थपूर्ण वाटाघाटी करून पैसे ओढण्यात ते ‘चॅम्पियन’ आहेत. त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी येणारे संस्थाचालक, शिक्षक, कर्मचारी प्रेमाने ‘चाचू’ म्हणतात. कोणत्या व्यक्तीस कसे अडचणीत आणायचे, हे माहीत असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही उघड बोलत नाहीत. तक्रार करीत नाहीत. त्यांच्या इशाऱ्यावरच ‘माध्यमिक’चा कारभार चालतो.
अधिकाऱ्यांच्या तोंडातही ‘चाचां’चे नाव सतत असते. टिप्पणी, शासनाला माहिती पाठवितानाही अधिकारी त्यांचेच मार्गदर्शन घेतात. भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुकानिहाय टक्केवारीवर टोळी कार्यरत केली आहे. अतिरिक्त शिक्षक, कर्मचारी समायोजनेत ‘चाचा’ने आणि संबंधित लिपिक, अधिकाऱ्यांनी चांगला ढपला पाडला आहे. यात अनेकांची लूट झाली असली तरी शिक्षण विभागातील साखळीमुळे सारेच मूग गिळून आहेत.
मंत्र्यालाही लाजवेल
असे लग्न..
वर्षापूर्वी कोल्हापुरात ‘चाचा’च्या मुलीचे लग्न झाले. लग्नातील जेवण, मंडप, मखमली गालिचा, शाही स्वागतकमान हे सर्व एका मंत्र्याला लाजवेल अशी व्यवस्था होती. त्यावरून ‘चाचा’ची वरकमाई किती असेल, हे स्पष्ट होते.