लहानपणापासून सांभाळलेल्या भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात मामाने टाकलं विष; कोल्हापुरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:00 IST2025-01-08T11:56:19+5:302025-01-08T12:00:04+5:30
कोल्हापुरात मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विषारी औषध टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

लहानपणापासून सांभाळलेल्या भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात मामाने टाकलं विष; कोल्हापुरातील प्रकार
सरदार चौगुले
Kolhapur Crime: कोल्हापुरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात मामानेच विषारी औषध टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात एका सांस्कृतीक हॅालमध्ये मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. महेश जोतीराम पाटील असे मामाचे नाव आहे. जेवणात विष टाकताना मामाला तिथल्या एका आचाऱ्याने पाहिल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मामा आणि आचाऱ्यामध्ये झटापट झाली. मात्र गोंधळ होताच मामा तेथून पळून गेला. आचाऱ्याच्या समोरच जेवणामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. याबाबत पन्हळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रिसेप्शनच्या जेवणात टाकलं विष
रिसेप्शनच्या जेवणात मिसळलेली औषधाची बाटली आणि अन्न पदार्थाचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. हे अन्न पदार्थांचे नमुने फॅारन्सिक लॅबमध्ये पाठवणार असून त्याच्या अहवालानंतर नेमके कोणते विषारी औषध त्यात टाकले होते हे समजणार आहे. घटनास्थळावरून संशयित आरोपी महेश पाटील पळून गेल्याने त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली आहे.
मामाच्या रागाचे कारण समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानपणापासून भाची महेश पाटील यांच्याकडे राहयला होती. उत्रे गावातील एका तरूणाशी तिचे प्रेम जुळलं होतं. मात्र ही बाब मामाला अजिबात पसंत नव्हती. दोघांचे प्रेम असल्याने महिन्यापूर्वी मुलाने लग्नासाठी मामाकडे परवानगी मागितली होती. परंतु मामाने लग्नास विरोध केला होता. त्यामुळे भाचीने मामाच्या मर्जी विरोधात जाऊन आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्न करून गावातून वरात काढली होती. त्यामुळे हा सगळा प्रकारा मामाला आवडला नव्हता. यामुळे आपली बदनामी झाल्याचे मामाला वाटले आणि त्याचा राग मामाच्या मनात होता.
मामा गुपचुप स्वयंपाक घरात शिरला
त्यानंतर मुलाकडील मंडळींनी मंगळवारी गावातील एका हॅालमध्ये रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवला होता. सकाळी ११.१५ च्या सुमारात नवऱ्याकडील मंडळी कार्यक्रमाच्या घाईगडबडीत असताना मामा महेश हातात औषधाची बाटली घेऊन गुपचुप स्वयंपाक घरात शिरला. त्यांनी बाटलीतील औषध शिजवलेल्या जेवणावर फेकायला सुरुवात केली. यातील काही औषध स्वयंपाक करणाऱ्या महिलांच्या अंगावरदेखील पडले.
आचाऱ्यामुळे वाचला शेकडो लोकांचा जीव
त्यावेळी तिथे असणाऱ्या आचाऱ्याने मामाला विरोध केला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. मात्र लोक जमण्यापूर्वीच मामाने स्वयंपाक घरातून पळ काढला. अन्नात ओषध फेकल्याची बातमी हॅालमध्ये समजल्यावर कार्यक्रमाला आलेल्या लोकांच्यात एकच गोंधळ उडाला. जेवणापूर्वी जेवणात औषध टाकल्याचा प्रकार घडल्याने गोंधळून गेलेली पाहुणे मंडळी हॅालमधून घरी निघून गेली. त्यानंतर संपूर्ण गावात दिवसभर या प्रकरणाची चर्चा सुरु होती.
दरम्यान, याप्रकरणी पन्हाळा पोलिसात नवरदेवाचे चुलते संजय गोविंद पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पन्हाळा पोलीस करत आहे.