‘नकोशी’ना समाजातही मानसन्मान मिळेल
By admin | Published: August 29, 2016 10:18 PM2016-08-29T22:18:14+5:302016-08-29T23:19:28+5:30
प्रियदर्शनी मोरे : चौगुले महाविद्यालयात ‘नकोशीला देऊया नवी ओळख’ कार्यक्रम उत्साहात
कोतोली : पन्हाळ्यातील नकोशी आता विद्या, राजलक्ष्मी, दिव्यानी, ऐश्वर्या नावाने वावरणार असल्याने, त्यांना समाजातही मानसन्मान मिळेल, असे प्रतिपादन पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी केले. येथील चौगुले महाविद्यालयात ‘नकोशींना देऊया नवी ओळख’ हा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अध्यक्ष के. एस. चौगुले होते.
मोरे म्हणाल्या, मुला-मुलींच्या गुणोत्तराच्या प्रमाणात पन्हाळा तालुका तळाला आहे. ते सुधारण्यासाठी लेक वाचवा अभियान सुरू आहे. त्यालाच ‘नकोशींना देऊया नवी ओळख’ या उपक्रमाची साथ मिळाली आहे. चौगुले महाविद्यालयाचे सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. आॅलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावण्याचे काम मुलींनीच केले आहे. या परिस्थितीतून मुलींनी ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी जन्मभूमीचे तसेच भारतीय संस्कृतीचे भान ठेवणे काळाची गरज आहे.
महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम स्फूर्तीदायक असून, मुलींनी स्वत:बद्दल असणारी असुरक्षेची भावना दूर केली पाहिजे, असे प्रतिपादन कळे पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मीना जगताप यांनी केले.
स्फूर्ती, जिद्द, धाडस या त्रिवेणी संगमाआधारे मुलींना कर्तव्य सिद्ध करता येते. सध्या शिक्षणक्षेत्रातही मुलींची आघाडी आहे, असे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले यांनी सांगितले. यावेळी नकुशा साळोखे, नकुशा पाटील व नकुशा कांबळे यांना अनुक्रमे स्नेहल साळोखे, पूजा पाटील व नेहा कांबळे असे नामकरण केले. यानिमित्त मुलींना महाविद्यालयाच्यावतीने नवीन कपडे दिले. त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले, सचिव शिवाजी पाटील-यवलूजकर, संचालक व जिल्हा नियोजन
मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. अजय चौगुले, प्रशासन अधिकारी प्रवीण आंबेरकर, प्राचार्य डॉ. जे. के. पवार, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. के. पावार यांनी, तर स्वागत प्रा. व्ही. पी. पाटील यांनी, सूत्रसंचालन प्रा. उषा पवार यांनी, तर आभार प्रा. एस. जी. कांबळे यांनी मानले. (वार्ताहर)
खर्च महाविद्यालय करणार
पन्हाळा तालुक्यातील ज्या मुलींना नावे बदलायची आहेत, त्यांचा सर्व खर्च महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहे, तरी याबाबत प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.