आजरा बसस्थानकावर अस्वच्छता, रोगराईची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:04+5:302021-07-16T04:18:04+5:30

आजरा : आजरा बसस्थानकाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यातच बसस्थानक परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने परिसरात मोठ्या ...

Uncleanliness at Ajra bus stand, fear of disease | आजरा बसस्थानकावर अस्वच्छता, रोगराईची भीती

आजरा बसस्थानकावर अस्वच्छता, रोगराईची भीती

Next

आजरा : आजरा बसस्थानकाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यातच बसस्थानक परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली आहे. घाणीच्या दुर्गंधीमुळे बसस्थानक परिसरात थोडा विसावा घेणेही जिकीरीचे बनले आहे. त्यामुळे बसस्थानक परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. आजऱ्याला अत्याधुनिक बसस्थानक व्हावे ही आजरेकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अत्याधुनिक बसस्थानकाला मंजुरी देऊन निधीही उपलब्ध करून दिला. त्यामुळे बसस्थानकाचे कामही सुरू करण्यात आले. हे काम अंतिम टप्प्यात असले तरी ठेकेदारांकडून सध्या खोळंबले आहे.

बसस्थानकात सायंकाळच्यावेळी रात्रभर मोकाट जनावरे आसरा घेत असतात. त्यांच्या मलमूत्राने बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही तरुणांनी आजरा बसस्थानकाचा अवैध व्यवसायासाठी वापर सुरू केला आहे. जनावरांचे मलमूत्र व काही दारूड्यांनी टाकलेल्या बाटल्यांनी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

चौकट : बसस्थानकावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त, बसस्थानकाची स्वच्छता व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी २४ तास वॉचमनची नेमणूक करावी व अशा गैरप्रकारांना आळा घालावा. नवीन बसस्थानक आगार व्यवस्थापकांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, युवा सेनाप्रमुख महेश पाटील, शहरप्रमुख ओमकार माद्याळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चौकट : दारूड्याची आगारप्रमुखांनाच मारहाण

पंधरा दिवसांपूर्वी आजरा आगारप्रमुख विनय पाटील बसस्थानकात सुरक्षा रक्षकांना घेऊन आले होते. याठिकाणी असणाऱ्या दारूड्याला त्यांनी हटकले असता संबंधित दारूड्याने आगारप्रमुखांनाच मारहाण केली. बसस्थानकात रात्रीच्यावेळी अवैध व्यवसायही सुरू आहेत. त्यामुळे आजऱ्याचे बसस्थानक म्हणजे अवैध व्यवसायाचा अड्डा बनला आहे.

फोटो ओळी : आजरा बसस्थानकात पसरलेले घाणीचे साम्राज्य व जनावरांचे मलमूत्र.

क्रमांक : १५०७२०२१-गड-०६/०७

Web Title: Uncleanliness at Ajra bus stand, fear of disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.