दुहेरी नगरसेवक पद्धतीने अस्वस्थता
By admin | Published: March 10, 2016 11:19 PM2016-03-10T23:19:19+5:302016-03-10T23:57:53+5:30
राजकीय क्षेत्रात खळबळ : प्रभाग रचना बदलणार, जनतेतून नगराध्यक्ष निवड
राजाराम पाटील --इचलकरंजी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकेरी नगरसेवक प्रभागाची रचना बदलून दुहेरी नगरसेवक प्रभाग आणि जनतेतून नगराध्यक्ष निवड अशी पद्धती अस्तित्वात येत असल्याने येथील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अशा निवडणुकीतून राजकीय पद्धतीत होणाऱ्या स्थित्यंतरामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
इचलकरंजी नगरपालिकेमध्ये झालेल्या बहुतांशी निवडणुका एकेरी नगरसेवक प्रभाग पद्धतीने झाल्या आहेत. मात्र, २००१ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी तिहेरी नगरसेवक प्रभाग आणि २०११ मधील निवडणुका चार नगरसेवक प्रभाग पद्धतीने झाल्या. २००१ मधील अपवाद वगळता सर्व निवडणुकांवेळी निवडून आलेल्या नगरसेवकांतूनच नगराध्यक्षांची निवड झाली.
एकेरी नगरसेवक प्रभाग पद्धतीमध्ये पक्ष किंवा नोंदणीकृत आघाडीऐवजी अपक्ष नगरसेवक निवडून येण्याची अधिक संधी असते आणि अपक्ष निवडून आले की, घोडेबाजार अधिक होतो, अशा निरीक्षणामुळे एकापेक्षा अधिक नगरसेवकांचे प्रभाग करून निवडणुका घेण्याची पद्धत संबंधित सरकारकडून अवलंबली जात आहे. २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत चार नगरसेवकांच्या प्रभागांची पद्धती अवलंबली. त्याचा चांगला लाभ दोन्ही कॉँग्रेसला झाला. त्यामुळे सध्याच्या सरकारकडून तीन किंवा चार नगरसेवकांच्या प्रभागाऐवजी आता दुहेरी नगरसेवक प्रभाग पद्धत अवलंबली जात असल्याची चर्चा आहे.
साधारणत: दोन महिन्यांपूर्वी आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या. त्यावेळी नगरपालिकांच्या निवडणुका एकेरी प्रभाग पद्धतीने होणार, अशी चर्चा सर्वत्र पसरली. त्याचा परिणाम म्हणून आगामी निवडणुकांना इच्छुक असलेल्यांनी आपापले संभाव्य प्रभाग निश्चित करून ‘तयारी’ सुरू केली. असे इच्छुक प्रभागातील सेवा-सुविधांसाठी आंदोलने करू लागले. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी आता दुहेरी नगरसेवक प्रभाग आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार, अशी पद्धत सरकार अवलंबणार असल्याच्या वृत्ताने येथील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे, तर अपक्ष म्हणून उमेदवारीची तयारी केलेल्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
२००१ मध्ये तीन नगरसेवकांचा प्रभाग आणि जनतेतून नगराध्यक्ष निवड अशी पद्धत अवलंबण्यात आली. त्यावेळी कॉँग्रेसकडून नगराध्यक्षा म्हणून किशोरी आवाडे निवडून आल्या. मात्र, त्यांच्या कॉँग्रेस पक्षास बहुमत मिळाले नाही. म्हणून तत्कालीन शहर विकास आघाडीबरोबर कॉँग्रेसला आघाडी करावी लागली.