सामान्यांतील असामान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:43 AM2017-08-17T00:43:11+5:302017-08-17T00:43:11+5:30

Uncommon in general | सामान्यांतील असामान्य

सामान्यांतील असामान्य

Next



कोल्हापुरात एकमेकांना मदत करणारे सामान्यांतील असामान्य खूप आहेत. त्यांचा फक्त शोध घेण्याची गरज आहे. इथल्या अनेक व्यक्ती समाजकार्यात स्वत:ला झोकून देत असतात. तेही स्वत:चे काम करून. मग ते कार्य रस्त्याच्या कडेला बेवारस पडलेल्या लोकांना मदत देण्याचे असो, की आपत्कालीन परिस्थितीत दुसºयांच्या मदतीला धावून जाण्याचे असो.
मनोरंजन हे एक असे क्षेत्र आहे, की जेथे केवळ पैशांशिवाय दुसरा विचार केला जात नाही, परंतु कोल्हापुरातील ‘प्रतिज्ञा’ या संस्थेमार्फत केले जाणारे वेगवेगळे कार्यक्रम हे कोणा ना कोणाच्या तरी मदतीसाठी केले जातात. वर्षभर असे वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम करीत इतरांना मदत करणारी प्रशांत जोशी ही सामान्यांतील असामान्य व्यक्ती आहे. स्वत:चा किंवा संस्थेचा नफा यांचा विचार न करता या कार्यक्रमातून मिळणारी रक्कम ते बिनबोभाट त्या-त्या गरजूपर्यंत पोहोचवितात. त्यांच्या या प्रयत्नात सामान्य लोकांच्या खिशाला फार मोठी कात्रीही लागत नाही. शिवाय आपण दुसºयाला काही ना काही तरी मदत केली, याचे समाधान त्यांना मिळते ते वेगळेच!
शिवाजी मराठा हायस्कूलचे कलाशिक्षक मिलिंद यादव हेही त्यांपैकीच एक. समाजाचे भान जागविणारी चळवळ त्यांनी सुरू केली. खरं तर चित्रपट पाहणे ही निव्वळ मनोरंजनाची बाब; परंतु समाजाला सोबत घेत त्यांनी ‘चिल्लर पार्टी’ ही चळवळ केली. मोठ्यांसाठी चित्रपट सहज उपलब्ध असतात; परंतु झोपडपट्टीतील मुलाला जगभरातील वेगळा विचार देणारे चित्रपट पाहायला मिळावेत, असा विचार करून त्यांनी ही चळवळ सुरू केली. या मुलांना मग जगभरातील वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट दर महिन्याला अगदी मोफत पाहायला मिळू लागले. त्यातून त्यांची अभिरुचीही समृद्ध झाली आणि विचारही बदलले. या मुलांनी आपल्याच शाळेतील गरीब मुला-मुलींना खाऊचे मिळणारे पैसे साठवून गणवेश, दिवाळीला कपडे, फटाके, चप्पल घेऊन दिले आहेत. यामागची प्रेरणा केवळ यादव सरच होते आणि ती प्रेरणा त्यांना अशाच एखाद्या चित्रपटातून मिळाली, हे ते अगदी उघडपणे सांगतात. ही मुले भले झोपडपट्टीत राहणारी असोत; त्यांच्यातील या जाणिवा समृद्ध करण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम करणाराही नोकरी करून घर चालविणारा एक शिक्षकच आहे.
जगभर पर्यावरण वाचविण्याच्या, समाजकार्य करण्याच्या गप्पा मारणारे अनेकजण सापडतील; पण त्याची स्वत:पासून सुरुवात करणारे किती जण असतात? कोल्हापुरात संतोष गाताडे या युवकाला भेटलात तर याचे उत्तर सापडेल. इंधन खर्च करणाºया वाहनाचा त्याने स्वत:हून त्याग केला आहे. तो शहरात चालत फिरतो. आता यात त्याने काय मोठे दिव्य केले? असा समज अनेकांचा होण्याचीही शक्यता आहे; परंतु तो शहरात जी वेगवेगळी कामे करीत असतो, त्याची माहिती जर समजली तर त्याच्या कामाचा आवाकाही समजेल. कुटुंबाऐवजी समाजासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा त्याचा स्वभाव अनेकांना माहीतही आहे. रोज न चुकता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात त्याची मूर्ती आढळेलच. तेथील झाडांना पाणी घालणारा, हृदय शस्त्रक्रिया विभागात दाखल असणाºया रुग्णांच्या नातेवाइकांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करून देणे असेल, पिण्याचे स्वच्छ पाणी मोफत देण्याची सोय उपलब्ध करून देणे असेल किंवा मग प्रसूती विभागात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवण देण्याची सोय करणे असेल; या युवकाच्या शब्दाखातर या सेवा सुरू झाल्या आहेत. केवळ दहा रुपयांत रुग्णसेवा देणारे रुग्णालय सुरू आहे, ते केवळ त्याच्या आग्रहामुळे. या व्यक्ती खºया अर्थाने समाजभान जागविणाºया आहेत.
- संदीप आडनाईक

Web Title: Uncommon in general

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.