समरजितसिंह यांच्या मुत्सद्दीपणाने बिनविरोध
By admin | Published: May 27, 2016 09:47 PM2016-05-27T21:47:16+5:302016-05-27T23:25:16+5:30
कागल बँक निवडणूक : कागल नगरपालिका, शाहू साखर कारखाना, जिल्हा परिषद निवडणुकांचाही विचार
जहाँगीर शेख -- कागल--जिल्ह्यात सर्वांत जुनी म्हणजे १९१७ मध्ये स्थापन झालेल्या दि कागल को-आॅप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक समरजितसिंह घाटगे यांच्या राजकीय मुत्सद्दीपणामुळे बिनविरोध झाली. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या निधनानंतर या बँकेचा निवडणूक कार्यक्रम झाला. त्यांच्या पश्चात बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रवाह तयार झाल्याने निवडणुकीसाठी फारसे इच्छुक दिसले नाहीत. तरीसुद्धा चार ते पाचजण शेवटपर्यंत उमेदवारीबद्दल अडून होते. त्यामध्ये बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या व्यक्तिगत वागणुकीचाच राग जास्त होता. एकूणच बँकेचे कार्य, राजेंच्या निधनाची सहानुभूती, सर्वच राजकीय नेतेमंडळींनी घेतलेली सहकार्याची भूमिका यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. असे चित्र दिसत असले तरी राजेंच्या निधनानंतर सांभाळलेला डोलारा, निवडणुकीची तयारी, पॅनेल रचना आणि इच्छुकांशी तसेच राजकीय नेत्यांशी साधलेला संवाद यातून राजे गटाचे नेते समरजितसिंह घाटगे यांचा राजकीय मुत्सद्दीपणाही या निमित्ताने समोर आला.
आमदार हसन मुश्रीफ यांनी आपला कोणताही कार्यकर्ता बँकेसाठी उमेदवारी दाखल करणार नाही. समरजितसिंह घाटगेंच्या पाठीशी उभे राहू, असे जाहीर केल्यानंतर माजी आमदार संजय घाटगे व प्रा. संजय मंडलिकांनीही आपल्या समर्थकांना अशाच सूचना केल्या. कागलमध्ये काही दिवसांपूर्वी शिवाजी सेवा संस्थेची निवडणूक झाली होती. तेव्हा समरजितसिंह घाटगेंनीही अशीच भूमिका घेतली होती.
दहा विद्यमानांऐवजी दहा नवीन चेहरे निवडताना कोठेही उघड नाराजी, भांडाभांडी, बंड, असा प्रकार होऊ दिलेला नाही. एकूणच अत्यंत संयमीपणा, तितकाच कठोर निर्णय घेण्याची चुणूक दाखवित या बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने समरजितसिंह घाटगे यांनी राजकीय परिपक्वतेचे आणि मुत्सुद्दीपणाचे दर्शन किमान तालुक्यातील राजकीय वर्तुळाला दाखविले आहे.
पॅनेल रचनेतील दूरदृष्टी...
समरजितसिंह घाटगे यांनी १४ जणांच्या पॅनेलची रचना करताना तात्पुरते राजकारण न पाहता पुढील राजकारणाचाही विचार केला आहे. त्यामध्ये कागल नगरपालिका, शाहू साखर कारखाना, जिल्हा परिषद निवडणुका यांचाही विचार केलेला दिसतो.
विद्यमान चौघांनाच उमेदवारी देताना दहाजणांना नव्याने संधी देत तरुण चेहरे दिले आहेत, तर तालुक्यातील दोघांना संचालक करीत बँकेच्या विस्तारीकरणाचे संकेत दिले आहेत.
बामणीच्या एम. पी. पाटलांचे सहकारात नाव आहे, तर रवींद्र घोरपडे गडहिंग्लजमध्ये राहतात. नव्या जुन्याचा मेळ घालीत नवे संचालक मंडळ दिले आहे.